पुणे : अर्ध्या सिंहगड रस्त्यावर ‘दिव्यांची अंधारयात्रा’ ! | पुढारी

पुणे : अर्ध्या सिंहगड रस्त्यावर ‘दिव्यांची अंधारयात्रा’ !

नरेंद्र साठे

पुणे : सर्वाधिक गर्दीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या सिंहगड रस्त्यावर रात्रीच्या अंधारात चाचपडत वाहन चालवावे लागत आहे. कारण या रस्त्यावर अनेक ठिकाणी एका बाजूचे, तर आनंदनगर ते वडगाव पुलापर्यंत दोन्ही बाजूंचे पथदिवे बंद पडलेले आहेत. ठिकठिकाणी असलेल्या ‘दिव्यांच्या अंधारयात्रे’मुळे खड्डे, गतिरोधक दिसत नाहीत. त्यात पुलाचे काम सुरू असल्याने गर्दीतून वाट काढत गाडी पुढे ढकलावी लागते.

सारसबागेपासून सिंहगड रस्त्याने पुढे निघाल्यानंतर दांडेकर पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या बाजूलाच लहान मुले खेळत असतात, नेमके येथेच पथदिव्यांचा व्यवस्थित प्रकाश नसल्याने अनेकदा अंदाज चुकतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दांडेकर पूल चौकातदेखील प्रखर उजेडाची गरज आहे. कारण, चौकातून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांची संख्याही जास्त असते. पुढे बसस्टॉप आहे, तिथे प्रवासी अंधारात उभे असतात.

कुठे कमी, कुठे जास्त अंतरावर दिवे

महापालिकेने रस्त्याच्या मधोमध आकर्षक खांब बसवून गोलाकार दिवे बसविले आहेत. त्या काही ठिकाणी सलग, तर काही ठिकाणी दोन खांबांमध्ये मोठे अंतर पडल्याने रस्त्यावर अंधारच असतो. तिथून पुढे पु. ल. देशपांडे उद्यान, राजाराम पुलापर्यंत पथदिवे सुस्थितीमध्ये आहेत. परंतु, येथेही पदपथावर मात्र अंधार आहे. त्यामुळे पादचार्‍यांना रस्त्यावरूनच रात्रीच्या वेळी चालत जावे लागते.

वाहनचालकांना करावी लागते कसरत

राजाराम पुलापासून वडगाव पुलापर्यंत पथदिव्यांचा सगळा बट्ट्याबोळ झाला आहे. एकतर उड्डाणपुलाचे काम नेमके याच भागात सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. तेथे बॅरिकेडिंग केले आहे. अनेकदा कामामुळे रात्री उशिरा रस्त्याची एक लेन बंद केली जाते. एकाच लेनवरून दोन्ही बाजूंची वाहतूक वळविल्यानंतर वाहनचालकांना कसरत करावी लागते. कारण, एकतर प्रकाश नाही आणि दुसरे म्हणजे समोरून येणारी वाहने आणि बाजूला असलेली लोखंडी बॅरिकेड यातून वाट काढावी लागते.

खड्डा, गतिरोधकही दिसेना

राजाराम पूल ते विठ्ठलवाडीच्या रस्त्यापर्यंत डाव्या बाजूचे पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. याच अंधारामध्ये खाद्यपदार्थ, फळ, भाजीविक्रेते थांबलेले असतात. पुढे चौकात सिग्नलला वाहने थांबल्यानंतर पदपथापर्यंत वाहने उभी राहतात. पदपथाच्या बाजूने नुकतेच खोदकाम झाल्याने ते काम अपूर्णावस्थेत आहे. परिणामी, अंधारात अंदाज चुकल्याने वाहने खड्ड्यात आदळून पुढे निघतात. पुढे हिंगणे चौकापर्यंतदेखील उजव्या बाजूचे आणि नंतर डाव्या बाजूचे, अशा दोन्ही बाजूंचे पथदिवे टप्प्याटप्प्याने बंदच आहेत. अशीच परिस्थिती आनंदनगर चौकापर्यंत बघायला मिळाली. तर, आनंदनगर ते वडगाव पुलापर्यंत दोन्ही बाजूंचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत.

पर्यायी मार्गही अंधारातच…

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून कालव्यालगतच्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. परंतु, या मार्गावरील पथदिवे अनेकदा बंद अवस्थेत असतात. एका खांबावरील दिवा सुरू, तर दुसर्‍या खांबावरील दिवा बंद असल्याचे चित्र नेहमीचे आहे.

पथदिव्यांबाबत तुमचे अनुभव कळवा

पुणेकरांनो, पथदिव्यांच्या दिव्य स्थितीचे आणि सोसाव्या लागणार्‍या गैरसोयींचा आँखो देखा हाल ‘टीम पुढारी’ने तुमच्यासमोर मांडला आहे. पुण्यात रात्री प्रवास करताना तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? ते थोडक्यात ‘पुढारी’ला 9823158113 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपने कळवा आणि रस्त्यांच्या-पथदिव्यांच्या स्थितीचे फोटोही पाठवा.

Back to top button