पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्याचे काम होणार तरी कधी ? | पुढारी

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्याचे काम होणार तरी कधी ?

मिलिंद पानसरे

धायरी (पुणे): बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत नर्‍हे येथील नवले पूल ते भुमकर चौकादरम्यान असलेल्या सेवा (सर्व्हिस) रस्त्यावरील अतिक्रमणांवर पाच महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर सेवा रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नसून, ते होणार तरी कधी, असा सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका व पीएमारडीए प्रशासनाच्या वतीने गेल्या 23 नोव्हेंबर रोजी सेवा रस्त्यावरील टपर्‍या, कच्ची व पक्की बांधकामे, पत्रा शेड, हॉटेल, दुकाने आदी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. सेल्फी पॉईंटजवळ सहा-सात वाहनांचा अपघात झाल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर भूमिगत विद्युत वाहिन्यांसह या रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरणाचे काम होणे गरजेचे होते. मात्र, या कारवाईला पाच महिने झाले, तरी प्रशासनाला सेवा रस्त्याचे काम अद्याप करता आले नाही. सेवा रस्त्यातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली असली, तरी महामार्ग परिसरात अपघातांची मालिका थांबलेली नाही.

या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. आंबेगाव बाजूकडील सेवा रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे व नर्‍हे बाजूकडील सेवा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. सेवा रस्त्यावर त्वरित काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा

या सेवा रस्त्याबाबत महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सतत पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्याप दखल घेण्यात आली नाही. महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात सेवा रस्त्याचे काम लवकर सुरू न केल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत आंबेगाव बाजूकडे नर्‍हे स्मशानभूमीलगत सेवा रस्त्याचे काम महापालिकेने प्रस्तावित केले आहे. त्यातील नाल्यालगत 180 मीटर लांबीच्या सीमा भिंतीचे काम सुरू केले आहे. परिसरातील जागा मालकाकडून सेवा रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.

                             – अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, रस्ते विभाग, महापालिका

रिलायन्स कंपनीच्या निविदेमधील सात मीटर रस्त्याचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. उर्वरित साडेतीन मीटर रस्ता करण्यासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव पालिकेकडे दिला आहे.

                  – संजय कदम, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Back to top button