खेडसाठी महत्त्वपूर्ण वेळ नदी कोरडी ठणठणीत | पुढारी

खेडसाठी महत्त्वपूर्ण वेळ नदी कोरडी ठणठणीत

वाफगाव; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी जीवनदायिनी असलेली वेळ नदी पूर्ण कोरडी ठणठणीत पडली आहे. यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावे व वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाण्याच्या टँकरच्या फेर्‍यात वाढ करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वेळ नदीवर असलेल्या धरणाच्या पाण्याचे संबंधित विभागाने योग्य नियोजन न केल्याने धरणाचा पाणीसाठा लवकरच संपला. त्यामुळे पूर्व भागातील गावांना या वर्षी लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी पूर्ण कोरडी ठणठणीत पडल्याने परिसरातील बंधारे व पाझर तलाव पाण्याअभावी कोरडे झाले आहेत.

तसेच, विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी, महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी उन्हात वणवण फिरावे लागत आहे. जनावरांचेही पाण्याविना हाल होत आहेत. शेतपिकेही पाण्याअभावी जळू लागली आहेत. सध्या गुळाणी, वाफगाव, चिंचबाईगाव, वरुडे, जऊळके बुद्रुक या गावांना मागणीनुसार शासनाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, दिवसेंदिवस तीव्र पाणीटंचाई वाढत असल्याने शासनाने टँकरच्या फेर्‍यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर, वरुडे सरपंच मारुती थिटे व उद्योजक ज्ञानेश्वर ढेरंगे यांनी केली आहे. दरम्यान, कनेरसर व पूर गावचे प्रस्ताव सादर झाल्याने या गावांनादेखील पाणी सुरू करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button