नवी दिल्ली ः आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखणे हेदेखील महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आता काय खावे, काय खाऊ नये याबाबत अनेक जण सजग आहेत. या पार्श्वभूमीवर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण कसे जेवावे, हे माहीत असणेही गरजेचे आहे. जर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नियंत्रित करायचा असेल, तर तुमच्या आहारात अधिक तंतुमय पदार्थ असण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा एक सामान्य विकार आहे, जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो. या विकारात काही लक्षणे तुम्हाला दिसू लागतात; ज्यामध्ये ओटीपोटात दुखणे, पोटात गोळा येणे, गॅस (वायू धरणे) व बद्धकोष्ठता किंवा दोन्हींचा समावेश असतो, असे एका नवीन अभ्यासानुसार दिसून आले आहे. संशोधक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी अलीकडच्या वर्षांत विशेषत: आतड्यांचे आरोग्य, तसेच सामान्य आरोग्य राखण्यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांच्या भूमिकेकडे बारकाईने लक्ष दिले आहे. वनस्पतीआधारित खाद्यपदार्थांमध्ये तंतुमय पदार्थ आणि एक प्रकारची हळूहळू सोडली जाणारी कर्बोदके असतात, हे पचनाच्या मदतीसाठी आवश्यक आहे. परंतु, हा नवीनतम अभ्यास तंतुमय पदार्थ आणि 'आयबीएस' यांच्यातील अधिक निश्चित दुवा स्थापित करतो.
तंतुमय पदार्थांच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. साधारणपणे फळे, भाज्या, धान्ये इत्यादी पदार्थांमधून शरीराला तंतुमय घटकाचा पुरवठा होतो. शरीरातील हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणाली, आतडे, रक्तातील शर्करेची पातळी राखण्यासाठी तंतुमय पदार्थ हा एक आवश्यक घटक आहे. तंतुमय पदार्थयुक्त अन्न हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे वारंवार सांगितले गेले आहे. संपूर्ण धान्य, शेंगदाणे व भाज्या यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये तंतुमयता हा घटक जास्त असतो. त्यामुळे असे
खाद्यपदार्थ पचनसंस्थेद्वारे अन्नाच्या संक्रमणास गती देतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा धोका कमी होऊन, आतड्यांसंबंधीच्या नियमित हालचालींना प्रोत्साहन मिळते.
हेही वाचा