अशी होती राजपरिवारासाठी रायगडावर पाण्याची व्यवस्था..! | पुढारी

अशी होती राजपरिवारासाठी रायगडावर पाण्याची व्यवस्था..!

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह राजपरिवाराच्या पिण्याच्या पाण्याचे तळे म्हणून प्रसिद्ध असलेल्या पानशेत धरणखोर्‍यातील दापसरे (ता. राजगड) येथील शिवकालीन तळे कडकडीत उन्हाळ्यातही खळखळून वाहत आहे. 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. या ऐतिहासिक घटनेस येत्या 6 जून रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त दापसरे ते रायगड जलकुंभ यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ व राजपरिवारासह 1648 ते 1673 असे तब्बल 26 वर्षे वास्तव्य केले.

कोकणातील रायगड किल्ल्यावर 1673 मध्ये शिवरायांनी राजधानीचा कारभार सुरू केला. रायगडावर शिवाजी महाराज व राजपरिवाराचे वास्तव्य होते. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचे निवासस्थान होते. पानशेत धरणात मुबलक पाणी असले, तरी धरणक्षेत्रातील डोंगरमाथ्यावरील टेकपोळे, गोंडखल वाड्या-वस्त्यांत भीषण पाणीटंचाई सुरू आहे. मात्र, दापसरे येथील शिवकालीन तळे दररोज शेकडो शिवभक्त नागरिक व जनावरांची तहान भागवत आहे.

मोटर बसवूनही तळ्यातील पाणी कमी होत नाही. दापसरे येथील वेणूबाई धोंडू केळतकर यांनी 116 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कन्या सावित्रीबाई आप्पाजी निवंगुणे सध्या हयात आहेत. त्यांचे वय 106 वर्षे आहे. या तळ्यातील पाणी थंडगार व आरोग्यवर्धक आहे. अनेक जण मुंबई, ठाणे आदी ठिकाणी पाणी घेऊन जातात. उंच डोंगराच्या पायथ्याशी तळ्यांचा उगम आहे. तळ्यातील पाण्यामुळे आजारपण येत नाही, उलट प्रकृती ठणठणीत राहते, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बारमाही वाहतूक; बारमाही पाणी

रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत धरणखोर्‍याच्या शेवटच्या टोकाला दुर्गम दापसरे (ता. राजगड) येथे शिवकालीन चवदार पाण्याचे तळे आहे. पुण्याहून पानशेतमार्गे 75 किलोमीटर अंतरावर दापसरे गाव आहे. पक्के डांबरी रस्ते झाल्याने बारमाही वाहतूक सुरू आहे. वाटसरू, पर्यटकांसह शेकडो रहिवाशांची तहान भागवूनही तळे कोरडे पडत नाही.

राजमाता जिजाऊ व शिवाजीराजे यांना रायगड, पाचाड येथील पाणी मानवत नसल्याने दापसरे येथील तळ्यातील चवदार व आरोग्यदायी पाणी दररोज घोड्यावरून जात असे. गारजाईवाडी, कोकण, दिवामार्गे रायगडावर आजही पायी अवघ्या दोन अडीच तासांत जाता येते. येथे शिवकालीन घोडदळ, बाजारहाट मार्ग आजही अस्तित्वात आहे.

– किसनराव केळदकर, ज्येष्ठ कार्यकर्ते

छत्रपती शिवरायांचे पाण्याचे तळे म्हणून या तळ्याची ख्याती आहे. दापसरे येथील तळे, शिवकालीन राजमार्ग, देवराई आदी ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.

– अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली (ता. राजगड)

हेही वाचा

Back to top button