रस्त्याची दुरवस्था : बिबवेवाडीकरांनी कोणाकडे दाद मागायची? स्थानिकांचा सवाल | पुढारी

रस्त्याची दुरवस्था : बिबवेवाडीकरांनी कोणाकडे दाद मागायची? स्थानिकांचा सवाल

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनशेजारील रस्त्याची दुरवस्था झाली आहे, याकडे ना महापालिकेचे लक्ष, ना विद्युत वितरण कंपनीचे लक्ष, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष झाल्यामुळे येथील प्रश्न बिकट झाला आहे. बिबवेवाडी परिसरातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल उपस्थित होत आहे. पद्मावतीमधील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वीजबिल भरणा असो किंवा नवीन मीटर नोंदणी तसेच वीजपुरवठ्यासंबंधी काही समस्या असो, यावरून अनेक नागरिक व महिलांची ये-जा असते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहाच्या प्रवेशद्वारापासून ते वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत कचर्‍याचे अनेक ढीग मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे त्यातच पाणी साठले आहे. काही ठिकाणी अनधिकृत पार्किंग, धूम्रपान करणार्‍यांची वर्दळ आणि गर्दी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या परिसरात प्रशासन आहे की नाही, असे नागरिकांना दिसून येते. अनेक दिवसांपासून या ठिकाणच्या रस्त्यावर अनेक समस्या आहेत, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात.

विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात मी आज वीजबिल भरण्यासाठी आलो होतो. तेव्हा अण्णा भाऊ साठे सभागृहाशेजारील गल्लीतील रस्त्यावर कचरा, खड्डे व पाणी साचल्याने या ठिकाणाहून चालणे अवघड झाले आहे.

– संतोष देवेंद्र, स्थानिक नागरिक

अण्णा भाऊ साठे सभागृहाशेजारील रस्त्याची स्वच्छता तातडीने करून त्या ठिकाणचा कचरा उचलून घेतला जाईल. तसेच, रस्त्यावर खड्डे किंवा तेथे पाणी कुठून येत आहे, ते तपासून त्याबाबत संबंधित अधिकार्‍याच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित करून घेतले जाईल.

– सुनील मोहिते, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, बिबवेवाडी

हेही वाचा

Back to top button