सिंहगड किल्ला अचानक बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड ; खडकवासला चौपाटीवरही नो एंट्री ! | पुढारी

सिंहगड किल्ला अचानक बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड ; खडकवासला चौपाटीवरही नो एंट्री !

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रविवारी खडकवासला येथील डीआयडी संस्थेच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला दुपारी बारा वाजता अचानक बंद करण्यात आला. तसेच खडकवासला धरण चौपाटीही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. मात्र, तीन वाजता सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. सिंहगड बंद केल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

गडावर गेलेल्या पर्यटकांना रणरणत्या उन्हात गडावरून खाली पाठविण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा गड खुला करण्यात आला. तोपर्यंत बहुतेक पर्यटक गडाच्या पायथ्याहून माघारी गेले होते. त्यामुळे ऐन सुटीच्या दिवशी पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. संरक्षणमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त धरण माथ्यासह धरण चौपाटी, डीआयडी परिसरात तैनात करण्यात आला आहे.

संरक्षणमंत्र्यांचा दौरा सोमवारी (दि. 15) दुपारी दोन वाजेपर्यंत असल्याने धरण चौपाटी बंद करण्यात आली आहे. तसेच परिसरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सिंहगड बंद ठेवण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते. मात्र, अचानक गड बंद करण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

पोलिसांच्या सूचनेनुसार रविवारी दुपारी बारा वाजता गड बंद करण्यात आला. त्यानंतर पुन्हा सूचना मिळाल्यानंतर तीनच्या सुमारास गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.
                                             -बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, सिंहगड वनविभाग

Back to top button