भोसरी सांडपाणी आल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी दुर्गंधी | पुढारी

भोसरी सांडपाणी आल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी दुर्गंधी

भोसरी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : भोसरी परिसरात ड्रेनेजलाइन चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या वतीने वेळेत दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
तसेच सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्त्याचीही दुरवस्था होत आहे. रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.

धावडेवस्ती येथील गुरुदत्त कॉलनी येथे अनेक दिवसांपासून चेंबरमधील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. परिसरातील ड्रेनेज वारंवार तुंबत आहे. परिणामी चेंबर तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले आहे. सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरातील नागरिकांना वाहतुकीतही अडचण आली आहे. शिवाय आरोग्याची समस्या गंभीर होत आहे. ड्रेनेज चेंबर ब्लॉक होण्याची समस्या अनेक दिवसांपासून असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या वतीने तत्पुरता स्वरूपाचे डागडुजी होत असल्याची तक्रार नागरिक करतात.

परिसरात दुर्गंधीचे वातावरण
परिसरातील नागरिकांची, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करतात. नागरिकांना ये जा करताना नाहक दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन पालिकेने परिसरातील सतत तुंबणारी ड्रेनेज व सांडपाणी समस्यांपासून कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button