पुणे : निविदा एकीकडच्या अन् काम भलतीकडेच ! येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे अजब कारभार | पुढारी

पुणे : निविदा एकीकडच्या अन् काम भलतीकडेच ! येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे अजब कारभार

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील काही कामांच्या निविदा एका ठिकाणच्या, तर कामे मात्र भलत्याच ठिकाणी करण्यात आली आहेत. जागा बदलासाठी आयुक्तांची परवानगी न घेता दुसर्‍या ठिकाणी कामे करण्यात आली असून, विशेष म्हणजे या कामांची बिलेदेखील अदा करण्यात आली आहेत. यात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाकडील मार्च अखेर प्रभाग क्रमांक 2, 6, 1 मध्ये झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांत अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे.

प्रभाग क्रमांक 2 मधील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील ड्रेनेजलाईन बदलण्यासाठी निविदा क्रमांक 262, 263 आणि 264 मार्चमध्ये काढण्यात आल्या होत्या. त्याची वर्क ऑर्डर मार्च अखेर झाली. कनिष्ठ अभियंता वृषाली तायडे (सध्या कसबा क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत) यांनी निविदा निघालेल्या जागेवर काम न करता ठेकेदाराकडून दुसर्‍या ठिकाणी काम करून घेतले आहे. कामांची जागा बदल करण्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी लागते. मात्र, या कामांबाबत तसे करण्यात आले नाही. वृषाली तायडे, उपअभियंता देवराम पंडित, प्रभारी सहायक आयुक्त चंद्रसेन नागटिळक यांनी कामाची जागा बदलून काम करून घेतले आहेत.

नियमबाह्य केलेल्या कामाचे मार्च अखेर रनिंग बिलदेखील अल्ताफ कन्ट्रक्शन या ठेकेदारास अदा केले आहे. दरम्यान, प्रभाग 2, 6 आणि 1 मध्ये मार्च अंतर्गत केलेल्या सर्वच कामांची चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल, त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडील सर्वच विकासकामांची चौकशी करण्यात यावी व यात दोषी आढळणार्‍या अधिकांर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्ताकडे सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेख यांनी निवेदनातून करण्यात केली आहे.

महाराष्ट्र हौसिंग बोर्डमधील ड्रेनेजलाईन बदलण्याच्या कामाबाबत तक्रार आली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांना बोलविण्यात आले असून, या कामांची सखोल चौकशी केली जाईल.
                                                            – किशोरी शिंदे, उपायुक्त, महापालिका

Back to top button