पुणे : होर्डिंग कारवाईसाठी पालिका घेणार पोलिसांची मदत | पुढारी

पुणे : होर्डिंग कारवाईसाठी पालिका घेणार पोलिसांची मदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून, कारवाईमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत येथे वार्‍यामुळे होर्डिंग कोसळून सहा नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये पुण्यातील मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातील रेल्वेच्या जागेतील होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर ज्याप्रकारे महापालिका प्रशासनाने होर्डिंगविरोधात मोहीम हाती घेतली होती, तशीच मोहीम आता रावेत येथील दुर्घटनेनंतर हाती
घेतली आहे.

दरम्यान, ही कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी गुरुवारी महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस झोनचे उपायुक्त व सहायक आयुक्त उपस्थित होते. या वेळी कारवाई केल्यानंतर लोखंडी साहित्य जप्त करण्यासंदर्भात चर्चा झाली तसेच जप्त केलेले साहित्य सडताना संबंधित होर्डिंगमालकाकडून कारवाईचा खर्च आणि दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी वकिलांच्या सल्ल्याने नोटीस बजाविण्यात येणार आहेत. याशिवाय कारवाईमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्या-त्या भागातील पोलिस ठाण्यांची मदत घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

जलसंपदा विभागालाही बजावली नोटीस

जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये 8 होर्डिंग आहेत. या होर्डिंगसंदर्भात जलसंपदाला नोटीस देण्यात आली आहे. या होर्डिंगचे शुल्क जलसंपदाच्या बिलातून वजा करण्यात येणार असल्याचेही डॉ. खेमनार यांनी सांगितले.

Back to top button