पिंपरी शहरातील कामगारांचे ‘कल्याण’; कामगारांना योजनांची माहितीच नाही | पुढारी

पिंपरी शहरातील कामगारांचे ‘कल्याण’; कामगारांना योजनांची माहितीच नाही

दीपेश सुराणा

पिंपरी : शहरातील कामगारांपर्यंत कामगार कल्याणाच्या विविध योजना पोचविण्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला अपयश येत आहे. मंडळाकडून राबविण्यात येणार्‍या अनेक योजनांविषयी कामगारांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत लाखो कामगार असून त्यांच्यापर्यंत मंडळाच्या योजना पोचविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शहरामध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे संभाजीनगर, उद्योगनगर (चिंचवड) आणि संत तुकारामनगर अशा तीन ठिकाणी केंद्र कार्यरत आहेत. कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

राज्यातील सर्व बँका, दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप, हॉटेल्स, उपहारगृह, रुग्णालये, सर्व उद्योग/आस्थापना यात काम करणारे नियमित, कंत्राटी, कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार/कर्मचारी यांना मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो. मंडळाच्या विविध योजनांची माहिती काही कामगारांना आहे. मात्र, बर्‍याच कामगारांना त्यांची माहितीच नसल्याने त्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही.

काय आहेत योजना ?

कामगारांच्या पाल्यासाठी सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तकांसाठी अर्थसहाय्य, एमएससीआयटी अर्थसहाय्य, गुणवंत विद्यार्थी गौरव, साहित्य प्रकाशन अनुदान, शिवण मशीन अनुदान योजना, गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य या प्रमुख योजनांसह कामगारांसाठी अन्य विविध योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे, कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार मंडळामार्फत देण्यात येतात.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची मला काहीच माहिती नाही. त्यामुळे या योजनांचा मी फायदाच घेतलेला नाही. कामगारांपर्यंत या योजना पोचायला हव्यात.

                – संजय शिंगे, वाहनचालक (कचरा वाहतूक)

मला कामगार कल्याणाच्या योजनांची माहिती नाही. कामगारांच्या योजना कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी कंपन्यांमध्ये कामगार कल्याण मंडळाकडून माहिती देण्यात यायला हवी. कंपन्यांमध्ये नोटीस बोर्डवर ही माहिती लावता येऊ शकते. योजनांची माहिती मंडळाच्या कार्यालयात गेल्यावर मिळते.

                             – रामकृष्ण पाटील, फॅब्रिकेशन फिटर.

कामगार कल्याण मंडळाकडून राबविण्यात येणार्‍या योजनांची मला माहिती नाही. या योजनांची माहिती मिळाल्यास त्याचा मी व माझे कटुंबीय लाभ घेऊ शकेल.

                                – कृष्णा खंदारे, सीएनसी ऑपरेटर

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती आमच्यापर्यंत पोचायला हवी. या योजनांची माहिती पोचत नसल्याने आम्हाला त्याचा फायदा घेता येत नाही. मला योजनांची माहिती नाही.

                            – संतोष हक्के, सीएनसी ऑपरेटर

मला कामगार कल्याणाच्या योजनांची माहिती नाही. कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची माहिती कंपनीत लावली जात नाही. मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध उपक्रम घेणे गरजेचे आहे. विविध खेळ, मॅरेथॉन, लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावे.

                          – मधुकर सलगर, मशीन ऑपरेटर.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांची मला माहिती आहे. मला गुणवंत कामगार पुरस्कारही मिळालेला आहे. कामगार कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळावा, यासाठी मी या योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करत असतो.
                                – राजेश हजारे, टेक्नीशियन

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी कंपन्यांमध्ये जाऊन पॉवर पॉइंट प्रेझंटेशन दिले जाते. कंपन्यांचा मनुष्यबळ विकास विभाग, कामगार युनियन प्रतिनिधी यांना याबाबत माहिती दिली जाते. गुणवंत आणि सामाजिक कार्य करणार्‍या कामगारांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनविले आहेत. त्या ग्रुपवर योजनांची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमातूनही योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहचविली जाते.

        – प्रदीप बोरसे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, केंद्र संचालक (चिंचवड)

Back to top button