दृष्टीहिन जोडप्यांचे अनोख्या विवाहसोहळ्यात जुळले बंध | पुढारी

दृष्टीहिन जोडप्यांचे अनोख्या विवाहसोहळ्यात जुळले बंध

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सनई-चौघडे आणि बँडच्या तालावर नाचणारी वर्‍हाडी मंडळी… देवघरापासून ते स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा लोकांनी सजविलेले रुखवत… आणि आपल्या मित्राचा लग्नसोहळा अनुभवित अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन बांधव अशा हृद्य वातावरणात दृष्टीहिन वधू-वरांचा विवाह सोहळा संपन्न झाला. डोळ्याने दिसत नसूनही उपस्थितांचे प्रेम आणि आपुलकीने त्यांचे डोळेही पाणावले.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट व लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतर्फे दोन दृष्टीहिन तरुण – तरुणींच्या अनोख्या विवाह सोहळ्याचे. सातारा जिल्ह्यातील महेश घोडपडे यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मैना राजोरे यांच्याशी झाला. तर रायगड जिल्ह्यातील नीरज कोळी यांचा विवाह नगर जिल्ह्यातील रेखा सोनवणे यांच्याशी झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुषमा सावंत आदी उपस्थित होते. उद्योजक सिद्धार्थ शहा व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी हेमंत गोसावी यांनी सपत्नीक कन्यादान केले.

मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष सागर कुलकर्णी, अमर लांडे, सचिन ससाणे, उमेश कांबळे, योगेश पासलकर, तन्मय तोडमल, साहिल आंबेडकर आदींनी आयोजनात सहभाग घेतला. सेवा मित्र मंडळ आणि इतर गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेऊन लुई ब्रेल संस्थेच्या सहकार्याने हा विवाह सोहळा पार पडला. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमांत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Back to top button