विमानगनगर ते वाघोलीपर्यंत होणार तीन मजली उड्डाणपूल | पुढारी

विमानगनगर ते वाघोलीपर्यंत होणार तीन मजली उड्डाणपूल

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विमाननगर ते वाघोलीपर्यंत तीनमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यामधील दोन लेन वाहतुकीसाठी, तर तिसर्‍या मजल्यावरून मेट्रो धावणार आहे. याबाबतचा ‘डीपीआर’ तयार करण्याच्या सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

नगर रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने आमदार सुनील टिंगरे यांनी याबाबत महापालिकेसमोर उपोषण केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी शुक्रवारी नगर रस्त्यावर होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासंदर्भात पाहाणी केली. आमदार टिंगरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र ढाकणे, प्रकल्पचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, एनएचएआयचे संजय कदम, पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजय मगर, माजी नगरसेवक महेंद्र पठारे आदी उपस्थित होते.

पवार यांनी संपूर्ण उड्डाणपुलाची माहिती घेऊन अधिकार्‍यांना सूचना दिल्या. मेट्रोचे व्यवस्थापकीस संचालक डॉ. ब्रिजेश देशमुख यांच्याशीदेखील पवार यांनी फोन वरून चर्चा करून मेट्रो चौथ्या मजल्यावरून धावण्याचा डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. नगर रस्ता परिसरातदेखील अनधिकृत व धोकादायक होर्डिंगची संख्या अधिक असून, त्यावर कारवाई करण्याच्या सूचना पवार यांनी अधिकार्‍यांना केल्या.

केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात शिक्रापूर ते वाघोलीपर्यंत
तीनमजली उड्डाणपूल करण्यात येणार आहे, तो थेट विमाननगरमधील हयात हॉटेलपर्यंत करण्यासंबंधीचा आराखडा तयार करावा.
तसेच वाघोली, लोहगावकडून पिंपरी-चिंचवडकडे जाणार्‍या रिंग रोडचे कामही तत्काळ सुरू करण्याच्या सूचना या वेळी पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

बीआरटी मार्ग काढून टाका…
बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा पोलिस आयुक्तांनी अहवाल दिला असून, आमदार व स्थानिक नागरिकदेखील तक्रारी करत असल्याचे सांगत बीआरटी मार्ग काढण्यास इतका हट्टीपणा का दाखवता, असा प्रश्न अजित पवार यांनी अधिकार्‍यांसमोर उपस्थित केला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगर मार्गावरील बीआरटी काढून टाकून परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिका अधिकार्‍यांना या वेळी दिल्या.

खराडी-शिवणे रस्त्यासाठी लवकरच निविदा
नगर रस्त्याला पर्यायी ठरणार्‍या खराडी-शिवणे रस्त्याच्या कामाचा आढावा या वेळी अजित पवार यांनी घेतला. या वेळी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी या रस्त्यावरील राहिलेल्या दोन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ती आता झाली पूर्ण झाली आहे. येत्या आठवडाभरात रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Back to top button