भाजपवर सर्वांचा विश्वास : चंद्रकांत पाटील | पुढारी

भाजपवर सर्वांचा विश्वास : चंद्रकांत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर सर्वच आपला अढळ विश्वास व्यक्त करत आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोथरूडमधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. या वेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उद्योजक समीर पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, श्याम देशपांडे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशातील प्रत्येकाचा भाजपवर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत. मोहोळ यांचा प्रवेश हा भाजपच्या संघटन वाढीसाठी नक्कीच फायदेशीर होईल,

जनतेने या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, राजकारण कोणत्या थराला चालले आहे. लोकशाहीत कोणाला प्रवेश द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून, ते उच्च तंत्रशिक्षणमंत्री आहेत. एका जबाबदार पक्षाचे अनेक वर्षे प्रांताध्यक्ष असून, त्यांनी या गोष्टी करताना विचार केलेला असेल, त्यामुळे याबाबत त्यांनीच उत्तर दिलेले बरे.
                                                             – अजित पवार, विरोधी पक्षनेते

 

Back to top button