अनाथ मुलीच्या मदतीला धावला वृत्तपत्रविक्रेता | पुढारी

अनाथ मुलीच्या मदतीला धावला वृत्तपत्रविक्रेता

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोली येथील वृत्तपत्रविक्रेते संतोष शिंदे व नागरिकांच्या सतर्कतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एका अनाथ मुलीचा जीव वाचला. पोलिसांच्या सहकार्याने मुलीला आव्हाळवाडी येथील माहेर संस्थेमध्ये सुखरूप दाखल करण्यात आले. शिंदे व नागरिकांचे परिसरातून कौतुक होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार (दि. 17 एप्रिल) चंद्रपूर जिल्ह्यातील एक अनाथ मुलगी (वय 30) तिच्या मित्रासोबत पुणे येथे कामानिमित्त आली होती. परंतु तिच्या मित्राने तिचे पैसे, कानातले व मोबाईल घेऊन वाघोली येथील वृत्तपत्रविक्रेते संतोष शिंदे यांचा स्टॉल असलेल्या वडापावच्या दुकानाजवळ सोडून निघून गेला.

मुलगी अनाथ असल्याने व कोणी ओळखीचे नसल्याने एकाकी पडली. त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार मनात घोळत होता. मुलगी तणावाखाली असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. तिची विचारपूस करून शिंदे यांनी तिला मानसिक आधार दिला. दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले सीताराम सातव, सोपानराव वीर, डॉ. शिवप्रसाद कोळपे, डॉ. ललित जाधव, दत्तात्रय सातव, गोरखनाथ जाधव यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर लोणीकंद पोलिस स्टेशनला संपर्क केला. लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार यांच्या सहकार्याने मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आव्हाळवाडी येथील माहेर संस्थेमध्ये दाखल करण्यात आले. वृत्तपत्रविक्रेते व नागरिकांच्या सहकार्याने एका अनाथ मुलीचा प्राण वाचल्याने नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

Back to top button