पुणे : कौटुंबिक हिंसाचाराचा खटला एका दिवसात निकाली | पुढारी

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराचा खटला एका दिवसात निकाली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पत्नीची साक्ष नोंदवित, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्यातील न्यायालयात प्रलंबित खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोळे यांनी एका दिवसात निकाली काढला. याप्रकरणातून पतीसह सासू, सासरे व विवाहित नणंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  प्रसाद आणि अनया (नाव बदलले आहे) यांचा विवाह 2018 मध्ये झाले. लग्नानंतर ती पुण्याहून हैदराबादला नांदायला गेली. मात्र, किरकोळ कारणावरून होणा-या भांडणात त्यांचे नाते फिस्कटले.

ती माहेरी निघून आली. पतीने हैदराबाद कौंटुंबिक न्यायालयात वैवाहिक संबंध पुनस्थापनेकरिता अर्ज दाखल केला. पण, तिने रागाच्या भरात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्याच्या न्यायालयात केस आणि पतीसह सासू सासरे व विवाहित नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला. नवरा व इतर नातेवाईकांना सत्र न्यायालय, पुणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर मध्यस्थीमार्फत वकिलांच्या प्रयत्नांनी पती-पत्नीने आपापसात तडजोड करून संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि हैदराबाद न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
पुणे येथे प्रलंबित असलेल्या 498अ केसमध्ये नवरा- सासू-सासरे आणि विवाहित नणंद हजर झाले व फिर्यादी पत्नीची साक्ष नोंदवित तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी नवरा, सासू, सासरा व विवाहित नणंद यांच्या वतीने अ‍ॅड. अमित राठी आणि अ‍ॅड. रमेश परमार यांनी कामकाज पाहिले व अ‍ॅड. अविनाश पवार यांनी साहाय्य केले.

 

Back to top button