पिंपरी : लघुउद्योजकांना खंडित वीजपुरवठ्याचा झटका | पुढारी

पिंपरी : लघुउद्योजकांना खंडित वीजपुरवठ्याचा झटका

दीपेश सुराणा

पिंपरी : शहरातील कुदळवाडी, तळवडे आणि भोसरी-शांतीनगर परिसरात कार्यरत असलेल्या लघुउद्योजकांना वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याचा झटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यास विलंब होणे, मशीनमधील काही सुटे भाग खराब होणे, कामगारांना कामाशिवाय बसवून ठेवावे लागणे आदी माध्यमातून आर्थिक व अन्य नुकसान होत असल्याने लघुउद्योजक त्रस्त झाले आहेत.

तळवडेत ट्रान्सफार्मरवर ताण
कुदळवाडी, तळवडे आणि भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योगांचा जलद विस्तार झाला आहे. या परिसरात छोट्या-मोठ्या शेडमध्ये विविध उद्योग सुरु आहेत. तळवडे परिसरात गट नंबर 63 आणि 70 येथे एकच ट्रॉन्सफॉर्मर आहे. तेथे ट्रॉन्सफॉर्मर (विद्युत रोहित्र) बसविण्यासाठी जागा न मिळाल्याने दुसरा ट्रॉन्सफॉर्मर बसविलेला नाही. त्यामुळे एका ट्रॉन्सफॉर्मरवर अधिकचा ताण येऊन व्होल्टेजमध्ये अडचणी, वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार वारंवार घडतात. उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतुंमध्ये प्रामुख्याने या समस्येचे प्रमाण वाढते, असे लघुउद्योजकांचे म्हणणे आहे.

कुदळवाडीत यंत्रणेचा अभाव
कुदळवाडी येथे वीज पुरवठा करण्यात येणार्‍या फीडरमधून मोई येथील स्टोन क्रशरच्या उद्योगांसाठी देखील वीज पुरवठा करण्यात येतो. कुदळवाडीमध्ये रहिवाशी आणि औद्योगिक परिसर आहे. त्या मानाने यंत्रणेचा अभाव पाहण्यास मिळतो. येथील यंत्रणेची क्षमता दुपटीने वाढविणे आवश्यक आहे.

भोसरीतही खंडित़ वीज पुरवठा
भोसरी जे ब्लॉक, एस ब्लॉक आणि टी ब्लॉक, शांतीनगर या परिसरातही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. महावितरणकडून येथे
तात्पुरती दुरुस्ती केली जाते. परिसरात वारंवार होणार्‍या खोदकामामुळे विद्युततारा तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याचा परिणाम लघुउद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर होतो, असे काही लघुउद्योजकांनी सांगितले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे अडचणी
कामावर परिणाम होऊन कंपन्यांच्या ऑर्डर देण्यास विलंब.
कामगारांना कामाशिवाय बसवून ठेवावे लागते.
खंडित वीजपुरवठा, व्होल्टेज समस्येमुळे मशीनमध्ये होतो बिघाड.
लघुउद्योजकांना सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड.

महावितरणची भूमिका काय ?
तळवडे परिसरात एक किलोमीटर अंतरात ट्रान्सफॉर्मर करण्यासाठी लघुउद्योजकांकडून जागा मिळालेली नाही. येथे किमान 200 केव्हीए क्षमतेचा ट्रॉन्सफॉर्मर बसवावा लागणार आहे. त्यासाठी जागा मिळाल्यास ट्रॉन्सफॉर्मर बसविता येईल. कुदळवाडी येथील फीडरमधून चाकण सबडीव्हजनसाठी वीजपुरवठा घेतला जात आहे. चाकण सबडीव्हजनला येथील लोड काढण्यास सांगितले आहे. शांतीनगर परिसरात रस्त्याच्या खोदकामामुळे भूमिगत विद्युततारा तुटतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. या विद्युततारांची दुरुस्ती झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला जातो, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

तळवडे परिसरात गट नंबर 63 आणि 70 येथे एकच ट्रॉन्सफॉर्मर आहे. तेथे जागा मिळत नसल्याने दुसरा ट्रान्सफॉर्मर महावितरणने बसविलेला नाही. येथे 100 एचपी क्षमतेचे पाच-सहा ट्रान्सफॉर्मर बसविणे शक्य आहे. कुदळवाडी आणि मोईसाठी स्वतंत्र फीडर असावे. भोसरी जे ब्लॉक, एस ब्लॉक, टी ब्लॉक, शांतीनगर या परिसरातही वारंवार खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवते.

              – संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना.

तळवडे परिसरात ट्रान्सफॉर्मर वाढवावे किंवा मोठी विद्युतकेबल टाकायला हवी. येथे व्होल्टेजची समस्या, वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. येथे महावितरणने छोटे-छोटे ट्रान्सफॉर्मर टाकले तरी लघुउद्योगांचा प्रश्न सुटेल. महावितरणने येथे फीडर पोल बसवावे.
                     – अतुल लुणिया, लघुउद्योजक (अ‍ॅटोमोबाईल), तळवडे.

भोसरी-शांतीनगर, एस ब्लॉक परिसरात छोटे-छोटे उद्योग कार्यरत आहेत. येथे महिन्यातील किमान 20 दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याची समस्या जाणवत आहे. परिसरात खोदकामामुळे वारंवार विद्युततारा तुटतात. त्याचा परिणाम वीजपुरवठा खंडित होतो. एकट्या शांतीनगर परिसरात सुमारे 750 छोटे उद्योग आहेत. त्यांच्यावर त्याचा परिणाम होत आहे.
                      – सचिन आडक, लघुउद्योजक (अ‍ॅटोमोबाईल), भोसरी.

कुदळवाडी येथील ट्रान्सफॉर्मरची क्षमता दुप्पट वाढविणे गरजेचे आहे किंवा ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवायला हवी. तसेच, येथे विद्युतविषयक नवीन अद्ययावत यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. कुदळवाडी-जाधववाडी सबस्टेशन मागणीची पूर्तता महावितरणने करायला हवी. परिसरात दररोज खंडित वीजपुरवठ्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे़ लघुउद्योगांचे 20 टक्के नुकसान होत आहे.

                    – विकास नाईकरे, लघुउद्योजक (अभियांत्रिकी), कुदळवाडी.

Back to top button