हापूसची दरवाढ कर्नाटकच्या पथ्यावर आवक, मागणीही वाढल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ | पुढारी

हापूसची दरवाढ कर्नाटकच्या पथ्यावर आवक, मागणीही वाढल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ

पुणे : कोकणच्या हापूसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा कर्नाटकच्या आंब्याकडे वळविला आहे. परिणामी, एरवी हापूसच्या तुलनेत कमी दर मिळणार्‍या कर्नाटक आंब्याला चांगले दर मिळू लागले आहेत. कर्नाटकातून आंब्याची आवक वाढूनही दरात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने हापूसची दरवाढ कर्नाटकच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. लहरी हवामानाचा फटका बसल्याने कोकणातील हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

सद्य:स्थितीत बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक आंब्याची बाजारातील आवक वाढत चालली आहे. एरवी कर्नाटकच्या आंब्याची आवक वाढल्यानंतर आंब्याच्या दरात घसरण होते. मात्र, यंदा बाजारात कोकणातील हापूस मुबलक उपलब्ध नसल्याने मोठी दरवाढ झाली आहे. हापूसचे दर सर्वसामान्यांना परवडत नसल्याने ग्राहकांनी कर्नाटकच्या आंब्याच्या खरेदीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे, त्याच्या दरातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर्नाटकच्या आंब्याच्या दरात वाढ झाली असली तरी कोकणच्या हापूसच्या तुलनेत तो खूपच स्वस्त असल्याने अक्षय्यतृतीयेच्या पार्श्वभूमीवर त्याची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिल्ली फ्रुट एजन्सीचे जुनैद शेख यांनी सांगितले.

यंदा एरवीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे. मात्र, आंब्याचा दर्जा खूप चांगला आहे. बाजारात आंब्याची आवक वाढत आहे. त्याबरोबर मागणी वाढत असल्याने दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंब्याची जूनच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत आवक सुरू राहील.
                                                  – रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी.

असे आहेत कर्नाटक आंब्याचे दर
हापूस (1 डझन) 300 ते 500 (1 किलो) 100 ते 140, पायरी (1 डझन) 300 ते 400 (1 किलो) 50 ते 70, लालबाग (1 किलो) 40 ते 60,
बदाम-बैगनपल्ली (1 किलो) 40 ते 60 रुपये.

Back to top button