पुणे : निळू फुले यांच्यासारखा साधेपणा जपणे हल्ली कठीण | पुढारी

पुणे : निळू फुले यांच्यासारखा साधेपणा जपणे हल्ली कठीण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘निळू फुले हे मोठे कलाकार होतेच. आजही ते आमच्यासाठी एक रसायनच आहेत. त्यांच्यासारखा मोठा नट होण्याचा प्रयत्न मी आजही करतोय. मात्र, आजच्या परिस्थितीत त्यांच्यासारखा साधा माणूस होणे, तो साधेपणा आपल्या व्यक्तिमत्त्वात जपणे, हे खरोखर कठीण आहे,’ अशी भावना अभिनेते सचिन खेडेकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

बेलवलकर सांस्कृतिक मंचतर्फे आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या कलारंग महोत्सवात सचिन खेडेकर यांचा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘निळू फुले सन्माना’ने गौरव करण्यात आला. समीर बेलवलकर, अजित बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते, जावई ओंकार थत्ते आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर दामले यांनी खेडेकर यांची मुलाखत घेतली.

गार्गी फुले-थत्ते म्हणाल्या, ‘बाई वाड्यावर या…’ या एका संवादापलीकडचा बाबा नव्या पिढीला एक नट म्हणून, एक माणूस म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून समजावा, तो विस्मरणात जाऊ नये, या उद्देशाने आम्ही हा सन्मान सुरू करीत आहोत. डॉ. पटेल यांनी निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. पटेल म्हणाले की, निळू फुले हा माणूस फार मोठे काही तरी करणारा आहे, हे डॉ. श्रीराम लागू मला कायम म्हणायचे. त्यांच्यासोबत काम करताना समोरचा नट प्रचंड सावध असायचा, असा त्यांचा वचकच होता. इतकेच नाही, तर त्यांची विचारांची बैठक देखील पक्की होती. कलाकाराला स्वतःची वैचारिक भूमिका असते का, असावी का, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे निळू फुले, असे सांगत निळू फुले यांनी सिंहासन चित्रपटातील दिगू टिपणीसच्या भूमिकेत केलेल्या चित्रपटाचा शेवट डॉ. पटेल यांनी उलगडून दाखविला.

Back to top button