विटा: पुढारी वृत्तसेवा : भाजपला संविधान आणि लोकशाहीमध्ये बदल करायचे आहेत. पुन्हा भाजपची सत्ता आल्यास सामान्य माणूस निवडणुकीला उभा राहू शकणार नाही, अशी भीती व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या प्रचार सांगता सभेत आज (दि.५) ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रा. नितिन बानुगडे-पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, अॅड. बाबासाहेब मुळीक, राजू जानकर, हिंदकेसरी संतोष वेताळ आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपने ज्या हुकूमशाही वृत्तीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्लीत त्यांच्या जागा येणार नाहीत. ज्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे, त्यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल करीत ३७० कलम काढल्यानंतर काश्मिरमध्ये काय फरक झाला. यापेक्षा काश्मिरी पंडीत पुन्हा तिकडे रहायला गेले का? हा प्रश्न आपण भाजपला विचारला पाहिजे. त्यांना तिकडे काश्मीरमध्ये दोन उमेदवार मिळेनासे झालेत, ही त्यांची अवस्था आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
आमचे सरकार असताना साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आम्ही महराष्ट्रात आणली. मात्र यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवले. आम्ही गुजरातच्या विरोधात नाही, मात्र महाराष्ट्रातील युवकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, हे आमचे प्राधान्य आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास नडायला मी उभा असेल, असेही ठाकरे म्हणाले.
माजी मंत्री विश्वजित कदम यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवताना कर्नाटकात महिलांची अहवेलना करणाऱ्या उमेदवाराला समर्थन देताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अशी टीका केली. त्यांनी पक्ष, परिवार फोडण्याचे काम केले. मात्र, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी बरोबर असल्याचा दावा करत देशात इंडिया अलायन्स, राज्यात महाविकास आघाडी विजयी होणार आहे, यांत सांगलीचीही भर पडेल, असे कदम म्हणाले.
हेही वाचा