पुणे : परकीय भाषांमधील साहित्यही आता मराठीत | पुढारी

पुणे : परकीय भाषांमधील साहित्यही आता मराठीत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जर्मन, रशियन, फ च, चिनी आणि जपानी आदी परकीय भाषांमधील साहित्यसंपदा मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण वाढले असून, अनेक प्रकाशकांनी आता परकीय भाषांमधील साहित्यसंपदा मराठीत आणण्याचा पुढाकार घेतला आहे. भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील साहित्य मराठीत अनुवादित होत आहेच. पण, आता परकीय भाषांमधील कवितासंग्रहांपासून ते कांदबरीपर्यंत असे साहित्य मराठीत अनुवाद केले जात आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज आणि नवोदित लेखक या अनुवादासाठी काम करीत असून, या अनुवादित पुस्तकांनाही वाचकांना चांगला प्रतिसाद आहे.

मराठी भाषेतील अनुवादित पुस्तकांचे दालन दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. त्यात आता परकीय भाषांमधील मराठीत अनुवादित पुस्तकांची भर पडत आहे. पुण्यातील काही प्रकाशक जर्मन, चिनी, रशियन, फ्रेंच, जपानी आदी भाषांमधील साहित्य मराठीत आणत असून, परकीय भाषांमधील नामवंत लेखकांची पुस्तके मराठीत येत आहेत.

प्रकाशक अखिल मेहता म्हणाले की, परकीय भाषांमधील साहित्यसंपदा मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. आम्हीही परकीय भाषांमधील काही पुस्तकांचा मराठीत अनुवाद करीत आहोत. जपानी, चिनी, फ्रेंच भाषांमधील पुस्तके आम्ही मराठीत आणली आहेत. सध्या अनुवादाचे प्रमाण वाढले असून, इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, चिनी, जपानी आदी भाषांमधील पुस्तकांचे मराठीत अनुवाद येत आहेत. त्याला प्रतिसादही चांगला आहे.

प्रकाशक रोहन चंपानेरकर म्हणाले की, जर्मन भाषेतील एक कवितासंग्रह आम्ही ’साक्षीभावाने जगताना’ या नावाने मराठीत अनुवाद केला आहे. जपानी लेखक शिंची होशी यांच्या जपानी भाषेत असलेल्या कथाही आम्ही मराठीत अनुवादित केल्या आहेत. आणखी काही जपानी पुस्तकांचे मराठीत अनुवाद सुरू असून, रशियन भाषेतील पुस्तकही आम्ही मराठीत आणत आहोत. आता परकीय भाषांमधील मराठीतील अनुवादाचे प्रमाण वाढत आहे.

  • जर्मनपासून ते चिनी भाषेतील पुस्तकांचा मराठीत होतोय अनुवाद

Back to top button