पुणे : कोट्यवधींच्या ठेवी; मग कर्जरोखे कशाला? सामाजिक संस्थांचा सवाल | पुढारी

पुणे : कोट्यवधींच्या ठेवी; मग कर्जरोखे कशाला? सामाजिक संस्थांचा सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे 2,955 कोटी रुपयांच्या ठेवी असताना जायका प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याची गरज काय? असा प्रश्न सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये जायका प्रकल्पासाठी 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन केले आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार आज रोजी बँकांमध्ये महापालिकेच्या 2,200 कोटी रुपयांच्या ठेवी 4 बँकांमध्ये आहेत, तर 755 कोटी रुपये शासकीय गुंतवणूक केली आहे.

या पार्श्वभूमीवर वेलणकर म्हणाले, मुळात या प्रकल्पाची निविदा अंतिम करण्यात पाच वर्षांचा काळ गेला. त्यामुळे प्रकल्पाची किंमत 500 कोटींनी वाढली, याचा भुर्दंड पुणेकरांच्या माथी बसणारच आहे. त्याउपरही या प्रकल्पासाठी भरमसाट व्याजदराने 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

या आधी 5 वर्षांपूर्वी महापालिकेने 200 कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले होते, ज्या पैशांचा विनियोग न करता आल्याने जवळपास तीन वर्षे हे पैसे किरकोळ व्याजदराने बँकेत ठेव म्हणून ठेवले गेले.
कर्जरोख्यांवर द्यावे लागणारे व्याज ठेवीवर मिळणार्‍या व्याजापेक्षा खूप जास्त असल्याने या प्रकरणात महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

Back to top button