प्रतीक्षा संपली ! आरटीई प्रवेशाची उद्या लॉटरी; प्राथमिक शिक्षण संचालकांची माहिती | पुढारी

प्रतीक्षा संपली ! आरटीई प्रवेशाची उद्या लॉटरी; प्राथमिक शिक्षण संचालकांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव 25 टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशासाठीची लॉटरी बुधवारी (दि.5) काढण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. यंदा अर्ज संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, लॉटरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. राज्यातील 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 64 हजार 470 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत.

त्यामुळे यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत उपलब्ध जागांच्या साडेतीन पटपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर प्रवेशाची लॉटरी कधी जाहीर होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले होते. गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेशप्रक्रियेची ऑन लाइन लॉटरी सकाळी अकरा वाजता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत होईल. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Back to top button