कळस परिसरातील वितरिकांची दूरवस्था; जलसंपदा विभागाने लक्ष देण्याची गरज | पुढारी

कळस परिसरातील वितरिकांची दूरवस्था; जलसंपदा विभागाने लक्ष देण्याची गरज

कळस(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : कळस परिसरातील वितरिकांची दूरवस्था झाल्याने हजारो एकरावरील क्षेत्र अद्याप ओसाड आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या कामाकडे लक्ष देऊन परिसरातील वितरिकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील वितरिकेलगतच्या लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे. परिसरातील शेतकर्‍यांच्या शेताजवळून खडकवासला कालव्याच्या वितरिका गेल्या आहेत. मात्र, आवर्तन काळात पाणी येत नाही, अशी स्थिती सर्वच वितरिकांची झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या वितरिकांना एक किलोमीटर अंतरापुढे पाणी येत नाही.

या वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, दगड-गोटे व मोठमोठी झाडे-झुडपे वाढलेली असल्याने परिसरातील वितरिकांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. कालव्याच्या आवर्तनातून परिसरातील छोटे-मोठे बंधारे व पाझर तलाव भरणे शक्य आहे. परंतु कालवा व वितरिकांची दूरवस्था आवर्तन काळात पाणी वितरणात मोठा अडथळा ठरत असल्याने परिसरातील हजारो एकर क्षेत्र पाण्याअभावी ओसाड पडले आहे.

परिसरातील वितरिकांची नव्याने दुरुस्ती केल्यास परिसरातील हजारो एकरावरील शेती बागायती होण्यास मदत होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी या कामासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील वितरिकालगतच्या लाभधारक शेतकरीवर्गामधून होत आहे.

काहींनी उजनीतून आणले पाणी
खडकवासला कालव्याच्या पाण्याची शाश्वती नसल्याने वैतागलेल्या काही शेतकर्‍यांनी सामूहिकपणे उजनीच्या पाण्याचा आधार घेत सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतर पार करून जलवाहिन्या आणल्या आहेत. अनेकांनी पावसाळ्यात पाणी साठवून उन्हाळ्यात उपयोगात आणण्यासाठी शेततळी उभारली आहेत.

शेतकर्‍यांनी स्वत: केला खर्च
कालव्याच्या लाभक्षेत्रातील 48, 49, 50 क्रमांकांच्या वितरिकेलगतच्या शेतकर्‍यांनी पाणी मिळावे म्हणून अनेकदा वर्गणी जमा करीत वितरिकांतील गाळ काढण्याच्या कामावर लाखो रुपये खर्च केल्याची उदाहरणे आहेत. परंतु, खर्च करूनही त्यांना पुरेसे पाणी मिळाले नसल्याची वस्तुस्थिती आहे.

Back to top button