मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

मेंढपाळावर बिबट्याचा हल्ला

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथे ढोबळे मळ्यात मेंढपाळ बाळू नाथा घुले (वय 28, रा. कुरूण, ता. पारनेर) याच्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 30) पहाटे घडली. या हल्ल्यात मेंढपाळाचा कान तुटला. त्याच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारगाव शिंगवे येथील ढोबळे मळा येथे मेंढपाळ घुले याचा मेंढ्यांचा वाडा आहे. घुले व त्यांची पत्नी कल्पना हे मेंढ्या बांधलेल्या ठिकाणी जाळीच्या बाजूला झोपले होते.

गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्यात घुले यांचा डावा कान तुटला. घुले व त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील उसाच्या शेतात पळून गेला. कानातून रक्तप्रवाह होत असला तरी ते बिबट्याच्या भीतीने पहाटेपर्यंत बसून राहिले. सकाळी त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कांबळे, डॉ. सचिन कांबळे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती कळताच वनरक्षक साईमाला गीते यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयास भेट दिली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी माजी उपसरपंच राजू ढोबळे यांच्यासह स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बिबट्या प्रतिबंधक लस पुरेशी नसल्याने अनेकदा रुग्णांना इतरत्र हलवावे लागते. रुग्णालयात पुरेशी लस उपलब्ध व्हावी यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली असल्याचे देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळू काळे यांनी सांगितले.

Back to top button