पुणे : द्राक्षांचा हंगाम बहरात; सर्वसामान्यांच्या आवाक्यात | पुढारी

पुणे : द्राक्षांचा हंगाम बहरात; सर्वसामान्यांच्या आवाक्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आंबट-गोड रसाळ द्राक्षांचा हंगाम बहरात आला असून, मार्केट यार्डातील फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो द्राक्षांची विक्री 50 ते 120 रुपये किलो दराने केली जात आहे. दरवर्षी द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. यंदा पाऊस लांबल्याने द्राक्षांचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला. एप्रिल महिन्यात हंगामाची अखेर होती. मात्र, यंदा द्राक्षांचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

घाऊक फळबाजारात काळ्या आणि हिरव्या द्राक्ष्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. जंबो, शरद, सरिता या जातींची काळी द्राक्षे बाजारात उपलब्ध आहेत. हिरव्या द्राक्षांमध्ये सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, थॉमसन या जातीच्या द्राक्षांना मागणी आहे. द्राक्षांचा हंगाम बहरात आला असून, दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. द्राक्षांची प्रतवारी आणि चव चांगली असून, त्यानुसार दर कमी-जास्त आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारातून अहमदाबाद, गुजरात, सुरत, कोलकात्ता येथील बाजारात द्राक्षे विक्रीस पाठविली जात असल्याचे द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज 20 ते 22 टन द्राक्षांची आवक होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातून द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे, तसेच बाजारात सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती आणि फलटण भागातून द्राक्षांची आवक होत आहे. एकूण आवक विचारात घेतल्यास 80 टक्के द्राक्षांची आवक एकट्या सांगली जिल्ह्यातून होत आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्षांची प्रतवारी दर्जेदार असून, चवीला चांगली असल्याची माहिती द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

घाऊक बाजारातील दर

  • काळी द्राक्ष
    जंबो (10 किलो) – 500 ते 900 रुपये
    कृष्णा सरिता (10 किलो) – 600 ते 900 रुपये
  • हिरवी द्राक्ष
    सोनाका (10 किलो) – 400 ते 600 रुपये
    सुपर सोनाका (10 किलो) – 400 ते 550 रुपये
    माणिक चमन (15 किलो) – 400 ते 600 रुपये
    थॉमसन – 350 ते 550 रुपये

Back to top button