शिंदे गावात सरपंच निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले | पुढारी

शिंदे गावात सरपंच निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या औद्योगिक (एमआयडीसी) क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सदस्यपदाला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंचाने नुकताच सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठ्या घडामोडी होऊन सरपंच होण्यासाठी इच्छुकांनी बहुमतासाठी ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी केली. याच पार्श्वभूमीवर शिंदे ग्रामपंचायतीचे एक सदस्य हरवल्याची तक्रार सदस्यांच्या वडिलांनी महाळुंगे पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. कायम शांततेचे वातावरण असलेल्या शिंदे गावाचे वातावरण सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य प्रकाश मेंगळे हे दोन दिवसांपासून हरवले असल्याने त्यांचे वडील दादू मेंगळे यांनी महाळुंगे पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे. कोणाच्यातरी मोटरसायकलवर बसून कुठेतरी गेल्याने त्याचा शोध घ्यावा, असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. खेड तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमध्ये शिंदे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र असून, गावच्या हद्दीत बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय अनेक नामवंत कंपन्या आहेत.

त्यामुळे येथील सरपंचासह उपसरपंच व सदस्यांना मानाचे पान म्हणून समाजात मोठे महत्त्व असून, परिसरात कोणताही सार्वजनिक कार्यक्रमातील प्रचारपत्रक किंवा लग्नपत्रिका यामध्ये यांची नावे हमखास असणारचं ही सत्यस्थिती आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्चून निवडून येतात. आता जनतेतून सरपंच निवड असल्याने खर्चाचे न विचारलेलेच बरे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तर मतदारराजाची दिवाळीच असते आणि ’मुँह मांगो दाम’ दिला जातो व उमेदवार खर्चाचा कसलाच विचार करत नाहीत. एमआयडीसी क्षेत्रातील ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपये पडून आहेत. कुठे खर्च करावा हे कळत नाही.

शिंदे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन देवकर यांनी ठरल्याप्रमाणे मुदत संपताच इतरांना संधी देण्यासाठी नुकताच आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या येथील गावच्या सरपंचपदाची निवडणूक येत्या 8 मार्चला होत आहे. शिंदे ग्रामपंचायतीत एकूण 9 सदस्य असून, गावातील दोन गटांत सदस्य विभागले आहेत. सध्यातरी एका गटाकडे पाच, तर दुसर्‍या बाजूच्या गटात चार सदस्य असल्याचे बोलले जात आहे. येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण खुले आहे. त्यामुळे सरपंच होण्यासाठी येथे मोठी स्पर्धा आहे. बहुमताचा आकडा बरोबर घेऊन एक गट राजकीय सहलीवर अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा असून, दुसर्‍या गटाने आमच्या दोन सदस्यांना फोडून आमिषापोटी नेल्याची चर्चा करीत आहे.

Back to top button