वेल्हे : रखडलेल्या पुणे-पानशेत रस्त्याचे विधानसभेत पडसाद | पुढारी

वेल्हे : रखडलेल्या पुणे-पानशेत रस्त्याचे विधानसभेत पडसाद

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : निधी अभावी रखडलेल्या सोनापूर येथील धोकादायक पुणे – पानशेत रस्त्यासह सिंहगड – खडकवासला भागातील हायब्रिड अ‍ॅम्युनिटी योजनेतील रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पडसाद विधानसभेत उमटले. खडकवासला धरणाच्या तीरावरील सोनापूर – रुळे गावच्या हद्दीवरील खचलेला पूल व दोन्ही बाजूंना भगदाडे पडलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळत नसल्याने काम ठप्प पडल्याचे सविस्तर वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झाले होते.

आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत गुरुवारी (दि. 2) तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तापकीर यांनी सिंहगड, तोरणा व राजगड या भागाला जवळच्या अंतराने जोडणार्‍या तसेच कोंढणपूर, पुणे-पानशेत रस्त्याचे खडकवासला येथील हायब्रिड अ‍ॅम्युनिटी योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले. गेल्या अधिवेशनातही शासनाकडे याबाबत विचारणा केली असता, तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी काम वेळेत पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले होते.

तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे तापकीर यांनी नमूद केले. श्रीरामनगर ते शिवापूर रस्ता अत्यंत खराब आहे. त्याचे कामदेखील अपूर्ण आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्यावरून प्रवास करणे अडचणीचे असताना कंत्राटदार आणि अधिकारी कार्यवाही करत नाहीत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, खडकवासला व खानापूर ते रांजणे हा सहा कि. मी. अंतराचा रस्ता खराब आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यास मान्यता मिळाली असून, ते काम लवकरच सुरू होईल. डोणजे, शिवापूर भागातील रस्ते नागरिकांच्या विरोधामुळे अडकले होते. नागरिकांच्या हरकतीप्रमाणे संपूर्ण रस्ते काँक्रीटचे होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोनापूर येथील धोकादायक पूल व रस्त्यासाठी निधी मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे तापकीर यांनी सांगितले.

Back to top button