पुणे : काळानुसार अपडेट ‘एसीबी’ ; तक्रार घेऊन लागलीच लावला जातो ट्रॅप ! | पुढारी

पुणे : काळानुसार अपडेट ‘एसीबी’ ; तक्रार घेऊन लागलीच लावला जातो ट्रॅप !

महेंद्र कांबळे : 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सरकारी काम अन् सहा महिने थांब… अशी म्हण प्रचलित आहे. पोलिस ठाण्यात किंवा एखाद्या विभागात तक्रार करायची म्हटले, तर अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. मात्र, लाचलुचपत विभागाने या म्हणीला फाटा देऊन थेट तक्रारदार वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाऊन तक्रारी घेतल्या आहेत. एवढेच नाही, तर केलेल्या सापळा कारवाईपैकी जवळ-जवळ 15 ते 20 टक्के कारवाया यशस्वी केल्या आहेत. लाच मागितल्याप्रकरणी मदत केंद्राला दूरध्वनी आल्यानंतर, तक्रारादाराचे व एसीबीच्या कार्यालयाचे अंतर किती आहे, हे पाहिले जाते. जर, तक्रारदार पन्नास ते शंभर किलोमीटर अंतराहून फोनद्वारे हेल्पलाईन क्रमांकावर फोन करीत असेल, तर एसीबीचे पथक थेट तो वास्तव्यास असलेल्या ठिकाणी जाते. तेथे त्याची तक्रार घेऊन सापळा लावला जातो.

राज्यात पुणे विभाग हा लाचखोरीमध्ये अव्वलस्थानी असल्याचे एसीबीचे आकडे सांगतात. 2022 मध्ये एसीबीने तब्बल 158 यशस्वी सापळ्यांमध्ये तब्बल 228 लाचखोरांवर कारवाई केली. त्यातील 30 हून अधिक सापळ्यांमध्ये पथकांनी ट्रॅप होण्यापूर्वी तक्रार घेऊन सापळे यशस्वी करून दाखवले आहेत. चालू वर्षात पुणे विभागात 18 ट्रॅपमध्ये सुमारे सहाहून अधिक प्रकरणात एसीबीने घटनास्थळी जाऊन तक्रार घेत ट्रॅप यशस्वी केले आहेत. प्रामुख्याने एखादी व्यक्ती ग्रामीण भागात राहत असते. त्यांची काही सरकारी कामासाठी त्याच्याकडे किरकोळ रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत लाच मागितली जाते.

अशा वेळी त्याला प्रत्यक्ष ग्रामीण भागातून पुण्यात येणे शक्य नसते. तसेच, आर्थिक खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी फोन करून तक्रार समजून घेऊन नंतर तक्रारीमध्ये ट्रॅप लावण्यायोग्य तक्रार असल्यास लाच स्वीकारली जाणार आहे, अशा ठिकाणी एसीबी जाऊन तक्रारदाराची तक्रार घेऊन ट्रॅप लावते. पुणे ग्रामीणमध्ये लावलेला ट्रॅप हा घटनास्थळी जाऊन एसीबींच्या अधिकार्‍यांनी तक्रार घेऊन लावला होता. त्यात सरकारी नोकरदार ट्रॅपमध्ये फसले.

एसीबी उपलब्ध केलेल्या 1064 या टोल क्रमांकावर शहरापासून दूर असलेल्या नागरिकांची तक्रार घेऊन त्यांच्या तक्रारीवर ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार घेतली जाते. त्याबरोबरच एसीबी महाराष्ट्र या संकेस्थळावर जाऊन थेट अ‍ॅपवर तक्रार करता येते. अ‍ॅपवर आलेल्या चार तक्रारींवर आमच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे.
– श्रीहरी पाटील, पोलिस उपअधीक्षक, एसीबी, पुणे

इथे साधा संपर्क…

नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या आहारी न जाता लाच देणे गुन्हा आहे, हे लक्षात ठेवून जागरूक राहणे आवश्यक आहे. जर सरकारी नोकरदाराकडून लाचेची मागणी केली जात असेल, तर त्याने 7875333333 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Back to top button