पुणे : कांदा, वांगी, शेवगा स्वस्त; टोमॅटो महाग | पुढारी

पुणे : कांदा, वांगी, शेवगा स्वस्त; टोमॅटो महाग

पुणे : महाशिवरात्रीमुळे फळभाज्यांची तोड न झाल्याने रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक घटली. रविवारी (दि. 19) बाजारात 80 ते 90 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाला. गतआठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने आवक घटली. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने टॉमेटोच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणी अभावी कांदा, वांगी व शेवग्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. आवक–जावक कायम राहिल्याने उर्वरित सर्व फळभाज्यांचे दर स्थिर राहिले.

परराज्यांतून झालेल्या भाजीपाल्याच्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून सुमारे 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, राजस्थानातून 7 ते 8 टेम्पो गाजर, आंध्र प्रदेश आाणि तमिळनाडूतून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थानातून 7 ते 8 ट्रक गाजर, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेशातून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून 20 ते 22 ट्रक मटार, बंगळूर येथून 1 टेम्पो आले, मध्य प्रदेश आाणि गुजरातमधून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 पोती, टोमॅटो 10 ते 12 हजार क्रेट्स, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदूर आणि स्थानिक भागातून बटाटा 30 ट्रक इतकी आवक झाली.

कांदापात, करडई व मुळ्याची भाववाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे चाकवत, पालक व अंबाडीच्या भावात जुडीमागे 5 रुपयांनी घट झाली आहे. तर, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदापात, करडई आणि मुळे यांच्या भावात 5 रुपयांनी वाढ झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

रविवारी (दि. 19) येथील बाजारात कोथिंबिरीची सव्वा लाख जुडी, तर मेथीची पन्नास हजार जुडींची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत दोन्हींचीही आवक स्थिर राहिली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 4 ते 10 रुपये, तर किरकोळ बाजारात 10 ते 25 रुपये इतके राहिले.

Back to top button