खडकवासल्यातून 1 मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन | पुढारी

खडकवासल्यातून 1 मार्चपासून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : शहर व जिल्ह्यातील 1 कोटी नागरिकांसह 66 हजार हेक्टर शेतीची तहान भागविणार्‍या खडकवासला धरणसाखळीतून लाभक्षेत्रातील शेतीला 1 मार्चपासून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांच्या साखळीत शुक्रवार (दि. 17) अखेर 19.54 टीएमसी म्हणजे 67.05 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत 1 टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 17 फेब्रुवारी 2022 रोजी धरणसाखळीत 18.53 टीएमसी म्हणजे 63.59 टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षी रब्बी आवर्तनाला सलग पाणी सोडण्यात आले होते. यंदा मात्र थंडीची लाट व लाभक्षेत्रातील शेतीला पुरेसे पाणी मिळाल्याने रब्बी आवर्तनाचे पाणी 6 फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आले. रब्बी आवर्तनाचे पाणी बंद झाल्याने तसेच उन्हाची तीव्रता वाढल्याने इंदापूर, दौंड, हवेलीसह खडकवासलाच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.

थंडीमुळे पाण्याची बचत
पावसाळ्यानंतर किंचित पावसाचा अपवाद वगळता ऑक्टोबरपासून फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत थंडी पडली होती. त्यामुळे पिकांना जादा पाण्याची गरज निर्माण झाली नाही. पिकांना पाणी मिळाल्याने खडकवासल्याच्या पाण्यात काही प्रमाणात बचत झाल्याचे पुढे आले आहे.

यंदा रब्बी आवर्तनाचे पाणी पुरेशा प्रमाणात शेतीला देण्यात आले. मुठा कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या लाभक्षेत्रातील शेतीला पाणीपुरवठा झाल्याने जमिनीत ओल आहे. त्यामुळे रब्बी आवर्तनाचे पाणी बंद करण्यात आले. आता 1 मार्चपासून शेतीला उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.
               – विजय पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला

पिण्यासाठीही पुरेसे पाणी
पुणे शहर आणि परिसरासह जिल्ह्यातील जवळपास 1 कोटी नागरिकांची तहान भागविण्यासाठी खडकवासला साखळीत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पुण्यासह जिल्ह्याचे लक्ष खडकवासल्याकडे लागले आहे. गेल्या वर्षी उशिरापर्यंत धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यानंतर थंडी पडली. त्यामुळे फेब—ुवारीअखेरीसही टेमघर वगळता सर्व धरणे तुडुंब भरली आहेत.

Back to top button