पुणे : चुकीच्या रम्बलरमुळे होतात अपघात ; वेळू येथील उड्डाणपुलाजवळील स्थिती | पुढारी

पुणे : चुकीच्या रम्बलरमुळे होतात अपघात ; वेळू येथील उड्डाणपुलाजवळील स्थिती

 

खेड-शिवापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-सातारा महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा यासाठी वेळू (ता. भोर) येथील उड्डाणपुलानंतर टाकलेले रम्बलर चुकीचे असल्याने दुचाकींचे अपघात होत आहेत. तर चारचाकी वाहनेही अनियंत्रित होत आहेत. हे रम्बलर तत्काळ काढून टाकावेत, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे यांनी केली आहे.
पुणे-सातारा महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रणात राहावा म्हणून शिंदेवाडी ते सारोळा या दरम्यानच्या अपघातप्रवण क्षेत्रात रम्बलर टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी वेळू येथील उड्डाण पुलालगतचे (पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे) रम्बलर हे चुकीच्या ठिकाणी टाकल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. रम्बलरमुळे पुलावरून आलेली भरधाव वाहने अनियंत्रित होतात. दुचाकींचे अपघात होत आहेत. त्यामुळे हे रम्बलर ताबडतोब काढून टाकावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत. पांगारे यांनीही रम्बलर काढून टाकण्याची मागणी केली आहे.

पोलिसांच्या सूचनेनुसारच रम्बलर टाकले आहेत. अपघात होत असतील, तर पोलिसांची सूचना आल्यास ते काढण्यात येतील.
– राकेश कोळी, रस्ते बांधकाम , अधिकारी, रिलायन्स इन्फ—ा.

शिंदेवाडी ते सारोळादरम्यान असणार्‍या अपघातप्रवण क्षेत्रात अथवा त्याठिकाणी रम्बलर टाकण्यास सांगितले होते. वेळू येथील उड्डाण पुलालगत ते टाकायला सांगितले नव्हते. त्या जागी अपघात होत असेल, तर ते रम्बलर हटविले जातील.
– सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड

 

Back to top button