पुणे : कवठे येमाई येथे बिबट्याचा वासरावर हल्ला | पुढारी

पुणे : कवठे येमाई येथे बिबट्याचा वासरावर हल्ला

टाकळी हाजी : शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्यांची दहशत कायम आहे. शुक्रवारी (दि. 10) पहाटेच्या सुमारास कवठे येमाई येथील म्हातोबानगर येथील बबनराव इचके यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. गाईंच्या ओरडण्याने इचके कुटुंबीय व आसपासचे लोक जागे झाल्याने बिबट्या पळून गेला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षे वयाचे वासरू गंभीर जखमी झाले.
इचके यांच्या घराजवळच त्यांचा गोठा आहे. गोठ्यात व परिसरात त्यांनी गाई बांधल्या होत्या.

वासरू बाहेरच्या बाजूला बांधले होते. पहाटेच्या सुमारास बिबट्याने वासरावर झडप घातली. त्यामुळे वासरू ओरडू लागले. त्याच्या आवाजाने इतर गायीदेखील जोरजोराने ओरडू लागल्या. त्यामुळे इचके कुटुंबीय व आसपासचे लोक जागे झाले. इचके यांनी गोठ्याकडे धाव घेताच बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याच्या वासरावरील हल्ल्याचा थरार इचके यांच्या घराच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पिंपरखेड परिसरात या आठवड्यात तीन बिबटे जेरबंद करण्यात आले असले, तरी टाकळी हाजी, कवठे येमाई, मलठण, वडनेर, जांबुत, माळवाडी, म्हसे, आमदाबाद, सविंदणे या गावांमध्ये बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. वन विभाग मात्र बिबट्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकर्‍यांच्या पशुधनावरील हल्ले थांबविण्यासाठी या भागात जास्तीत जास्त पिंजरे लावण्याची मागणी कवठे येमाईच्या सरपंच सुनीता पोकळे आणि माजी सरपंच बबनराव पोकळे यांनी केली आहे.

Back to top button