गडचिरोली : जादूटोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळले, १४ जणांना अटक

file photo
file photo

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जननी देवाजी तेलामी (वय ५२) आणि देवू कटया आतलामी (वय ६०) अशी मृतांची नावे आहेत. आरोपींमध्ये जननी तेलामी हिचा पती देवाजी तेलामी (६०) आणि मुलगा दिवाकर तेलामी(२८) यांचा समावेश आहे.

जननी आणि देवू हे वेगवेगळ्या कुटुंबातील असले; तरी ते पुजारी म्हणून काम करीत होते. त्यामुळे ते जादुटोणा करतात, असा काही जणांना संशय होता. अशातच जीवनगट्टा-चंदनवेली मार्गावरील बोलेपल्ली येथील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिनाभरापूर्वी एक महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. याच कुटुंबातील एका दीड वर्षीय मुलीचा १ मे रोजी मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू जननी तेलामी आणि देवू आतलामी यांनी जादुटोणा केल्यामुळे झाला, असा त्या कुटुंबीयांचा संशय होता. त्यामुळे कुटुंबीय काही जणांना सोबत घेऊन १ मे रोजी रात्री जननी आणि देवूच्या घरी गेले. त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर त्यांना गावाजवळच्या नाल्यात नेऊन जाळले.

याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १४ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. घटनेनंतर अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाच महिन्यातील दुसरी घटना

जादुटोण्याच्या संशयावरुन हत्या केल्याची गडचिरोली जिल्ह्यातील पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. ७ डिसेंबर २०२३ रोजी भामरागड तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध पती, पत्नी आणि त्यांच्या नातीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातही मृतांच्या दोन मुलांना अटक करण्यात आली होती. हे गावसुद्धा एटापल्ली तालुक्याच्या सीमेवर आहे. या घटनेनंतर आता बारसेवाडा येथे हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news