Sharad Pawar : मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, चोपडा येथील सभेत शरद पवारांचा हल्लाबोल | पुढारी

Sharad Pawar : मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, चोपडा येथील सभेत शरद पवारांचा हल्लाबोल

जळगाव- कुठेही जाण्यासाठी शिक्षणासाठी किंवा कामाला जाण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत नेण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलचा वापर करावा लागतो. आज पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढलेल्या असून दोन्ही इंधनाच्या किमती सारख्याच झाल्या आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो आहे. त्यातून शेतीमालाच्या किमतीही वाढतात. मात्र मोदींनी 2014 मध्ये दिलेल्या शब्द पाळला नाही, महागाई कमी करु म्हणाले होते ती झालीच नाही, याउलट ती अधिक वाढली अशी टीका चोपड्याच्या सभेमध्ये शरद पवार यांनी केली.

आज चोपडा येथे महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, शेतकरी व पेट्रोल- डिझेलच्या किमती या एकमेकांवर परिणाम करणाऱ्या असतात. यामुळे अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो. मोदींनी 2014 मध्ये शब्द दिला होता की, पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील मात्र तसे झाले नाही. तसेच गॅस सिलेंडर जो गृहिणींचा सर्वात महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे त्याचेही दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज अकराशे रुपये पर्यंत सिलेंडरचे भाव गेले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे वचन मोदींनी दिले तेही पूर्ण केले नाही. आज बेरोजगारी वाढली आहे. सत्तेचा वापर हा लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो मात्र मोदी सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.

शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या खर्चाच्या किमतीत भाव मिळाला पाहिजे मात्र तो आज मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाल्याचे ते म्हणाले.

अयोध्याच्या रामाला तुमचे मत पोहोचेल

तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील विरोधकांना उद्देशून म्हणाले की,  तुम्ही राम राम करतात आम्ही श्रीराम आणला आहे. त्यामुळे अयोध्याच्या रामाला तुमचे मत पोहोचेल. या ठिकाणी केळीची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी केळीची चेन उभी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करण्याची गरज आहे. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. सोयाबीनला भाव नाही कांद्याची मागणी होती मात्र त्याला बंदी घातली. फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यात करण्याची ऑर्डर काढली होती. ज्यावेळेस विरोध होऊ लागला त्यावेळेस महाराष्ट्राच्या एका नेत्याने ट्विट करून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाल्याचे जाहीर केले.  मात्र प्रत्यक्षात गुजरात मधील सफेद कांदा निर्यात झाला महाराष्ट्रातील कांदा तसेच पडून होता असे प्रचार सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा –

Back to top button