ICC Rankings : ऑस्ट्रेलिया कसोटीत अव्वल! टी-20, वनडेमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व कायम | पुढारी

ICC Rankings : ऑस्ट्रेलिया कसोटीत अव्वल! टी-20, वनडेमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Rankings : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला मागे टाकून या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. मात्र, वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघाचे वर्चस्व कायम असून या दोन्ही फॉरमॅटमध्ये रोहित सेना पहिल्या स्थानावर कायम आहे.

कांगारूंचे 124 गुण (ICC Rankings)

सध्या टीम रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे 124 रेटिंग गुण पॉईंट्स आहेत. त्यानंतर दुस-या क्रमांकावरील भारतीय संघाच्या खात्यात 120 रेटिंग पॉईंट्स जमा झाले आहेत. याशिवाय इंग्लंड (105 रेटिंग पॉईंट्स), आणि दक्षिण आफ्रिका (103) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या स्थानावर आहेत.

गेल्यावर्षी इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विजयानंतर कांगारू संघाचे रेटिंग पॉइंट 124 झाले आणि ते टीम इंडियाच्या 4 गुणांनी पुढे गेले.

टी-20, वनडेत टीम इंडियाचा दबदबा

वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. वनडेमध्ये 122 तर टी-20 मध्ये 264 रेटिंग गुण मिळवून रोहित सेना पहिल्या अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ वनडेत 116 आणि टी-20 मध्ये 257 रेटींग गुण मिळवून दुस-या स्थानी आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला असला तरी टीम इंडियाने आपली आघाडी तीनवरून सहा गुणांपर्यंत वाढवली आहे.

Back to top button