पुणे : पिफमध्ये ‘मदार’ ने उमटविली मोहोर | पुढारी

पुणे : पिफमध्ये ‘मदार’ ने उमटविली मोहोर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एकविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ‘मदार ’ या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. राज्य सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मदार या चित्रपटाने मिळवला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सिनेमाटोग्राफरचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला आहे. त्याशिवाय यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ—ान्स येथील ‘तोरी अँड लोकिता’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा
समारोपाला सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जानू बरवा, चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

आम्ही तुम्हाला पुण्यात जागा देऊ, तुम्ही चित्रनगरी उभारा, जेणेकरून पुण्यातील कलाकारांना मुंबईला जावे लागणार नाही, अशी मागणी पाटील यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. बालन म्हणाल्या, हल्ली अनेक जण मोबाईल, विविध सोशल मीडिया यावर चित्रपट पाहता असतात. त्यामुळे चित्रपट महोत्सवात येऊन ते चित्रपट पाहतील का? असा प्रश्न पडतो. मात्र या महोत्सवाने या प्रश्नांचे अतिशय समर्पक उत्तर दिले आहे. फिल्म इक्विटी स्टॉक एक्सचेंज स्थापन करणार

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज हे धन वाढविण्यासाठी इक्विटी देतात. त्याप्रमाणे मनाला समाधान देण्यासाठीही इक्विटी देणारे काहीतरी असावे असे वाटले. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या धर्तीवर चित्रपटाला इक्विटी देणारे फिल्म इक्विटी स्टॉक एक्सचेंज सुरू करणार आहे. ज्यांना चित्रपट बनवायचा आहे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी मुनगंटीवार यांनी राज्य सरकारतर्फे घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, ’नाट्य, सिनेमा, साहित्य या सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सर्वशक्तिनिशी कार्यरत आहे. जगात 2 हजारांपेक्षा अधिक चित्रपट तयार करणारी इंडस्ट्री भारताची आहे. चित्रपटसृष्टीला बळकट करण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत.

Back to top button