वेल्हे : सोळा कोटींच्या वेल्हे-भट्टी रस्त्याचे काम संथगतीने | पुढारी

वेल्हे : सोळा कोटींच्या वेल्हे-भट्टी रस्त्याचे काम संथगतीने

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ असलेल्या तोरणा किल्ला परिसरात तब्बल 16 कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात येत असलेल्या 17 किलोमीटर अंतराच्या वेल्हे ते भट्टी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याचे काम न करता पुढील रस्ता खोदल्याने तसेच उडणार्‍या धुळीने वाहनचालकांसह स्थानिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे तसेच अपघाती केळद खिंड व भट्टी खिंडीतील घाटरस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे.

सध्या वेल्हे-भट्टी रस्त्याचे पासलीपर्यंतचे काम सुरू आहे. रस्ता खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रुंदीकरण न करता तीन मीटरचे खडीकरण केले जात आहे. कठीण दगड, खडक न फोडता केवळ मुरूम, मातीच्या ठिकाणीच रुंदीकरण केले जात आहे. पूर परिस्थिती निर्माण होणारे ओढे, कड्याखालील पुलांची कामेही थंडावली आहेत.

एका बाजूचे खोदकाम करून टप्प्याटप्प्याने डांबरीकरण न करता ठेकेदाराने केवळ खोदकामाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे धुळीचे लोट व वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अनेकांना अपघात देखील घडले आहेत. या रस्त्यावरून दिवसा देखील दुचाकी चालविणे जिकिरीचे बनले आहे. रात्रीच्या वेळी तर हा रस्ता अपघातांना हमखास निमंत्रण देतो. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पावसाळ्यापूर्वी केळदपर्यंतचे काम पूर्ण होण्याचे आव्हान असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

वेल्हे-भट्टी रस्ता डोंगरमाथे तसेच कडे-कपारीतून जातो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे काम व्हावे, यासाठी रस्त्याचे खोदकाम करून प्रथम मजबुतीकरण केले जात आहे. या भागात अतिवृष्टी होत असल्याने डोंगर-कडे, ओढे-नाल्यांच्या पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक ठिकाणी पूल, संरक्षक कठडे आदी कामे करण्यात येत आहेत. निविदेप्रमाणे रस्त्याचे काम अधिक दर्जेदार व्हावे, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. त्यासाठी अभियंते देखरेख करीत आहेत. खोदलेल्या रस्त्यावर पाणी मारणे, खडकाळ भागात आवश्यक रुंदीकरण केले जाणार आहे. तशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

                             – संजय संकपाळ, उपविभागीय अधिकारी,
                               सार्वजनिक बांधकाम विभाग, वेल्हे विभाग

सलग दूर अंतरापर्यंत रस्त्याचे खोदकाम न करता एका बाजूलाच खोदकाम करून टप्प्याटप्प्याने रस्ता करण्यात यावा तसेच खोदलेल्या रस्त्यावर पाणी मारावे. निविदेप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्यात यावे.

                 – रमेश शिंदे, कार्याध्यक्ष, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button