पुणे : वंचित आघाडीशी युती हे चांगले झाले; सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया | पुढारी

पुणे : वंचित आघाडीशी युती हे चांगले झाले; सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

पुणे : ‘वंचित बहुजन आघाडीशी  शिवसेनेची युती झाले हे चांगले झाले. आमच्या विचारात साम्य आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (दि.25) व्यक्त केली. ‘शिवसेनेनं ठरवलं असतं तर देवेंद्र फडणवीसांना कधीच आत टाकलं असतं, पण आम्ही भाजपासारखं सुडाचं राजकारण कधीच केले नाही,’ असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले. ‘मात्र, त्यांनी असे काही पाप केले असेल की, ज्याची चौकशी करावी लागेल तर तेही त्यांनी स्पष्ट करावे,’ अशी टिप्पणीही केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मविआ सरकार मला जेलमध्ये टाकणार होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर अंधारे यांनी पुण्यातील शिवसेनेच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मत मांडले. फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.

त्यांनी कधीच भाजपासारखं सुडाचं राजकारण केलं नाही. तेव्हा त्यांनी ठरवलं असतं तर देवेंद्र यांना जेलमध्ये टाकलं असतं. त्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांना या पदाचे सर्व अधिकार माहिती आहेत, तेव्हापासून ते सुडाचं राजकारण करतात. आता जरी आमचे बंधू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी खरी सूत्रे देवेंद्रच हलवित आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात सारखं असं काय घोळत आहे, त्यांनी असं काही पाप केलं आहे का, ज्यामुळे त्यांना त्याची चौकशी करावी लागेल, हे त्यांनी जनतेला सांगावे.

आमच्या विचारात साम्य
वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युती केली आहे. तुम्ही शिवसेनेत आलाय, तेव्हा ते म्हणाले होते, तुम्हाला ओळखत नाहीत. या प्रश्नावर स्मितहास्य करीत आंधारे म्हणाल्या, ‘वंचित बहुजन आघाडीशी युती झाली हे चांगले झाले, कारण आमच्या विचारात साम्य आहे. राहिला प्रश्न ओळखीचा, आता त्यांच्याशी ओळख होईलच.’ या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांची उपस्थिती होती.

Back to top button