पुणे : उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता वाढविणार | पुढारी

पुणे : उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता वाढविणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता वाढविणे, प्रवेशयोग्य, सर्वसमावेशक आणि परवडणारी उच्च शिक्षण प्रणाली तयार करणे, संशोधन आणि नवोपक्रमातील उत्कृष्टतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे, शाश्वतता आणि सामाजिक सुधारणेचा पाठपुरावा करणे, शिक्षणातील आंतरराष्ट्रीयीकरण आणि जागतिक कनेक्शनचे मूल्ये प्रदर्शित करणे व भारताच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार व प्रसार करणे, असा जाहीरनामा कुलगुरूंच्या परिषदेत सर्वानुमते घोषित करण्यात आला, अशी माहिती आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘भारतीय उच्च शिक्षणाचे धोरण व परिवर्तन’ या विषयावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘हायर एज्युकेटर्स फाउंडेशन’ तर्फे आयोजित तीनदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी वर्माट युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमेला, कुलगुरू डॉ. संविक भट्टाचार्य, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. सुब्बाराव उपस्थित होते.

डॉ. संजय धांडे म्हणाले की, भारतातील उच्च शिक्षणाच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी कृती करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार राष्ट्र पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल. न्याय, शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण जगाची प्रगती करणार्‍या जागतिक समुदायामध्ये एक आदरणीय भागीदारी म्हणून सहभागी होणार आहोत.

राहुल कराड म्हणाले की, देश-विदेशातील कुलगुरूंच्या विचारांच्या आदान-प्रदानामुळे भारतीय शिक्षणाचा स्तर खूप उंचावेल. हे शिक्षणक्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल असेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार्‍या विभिन्न समस्यांचे निराकरण कसे करता येईल तसेच भारतीय शिक्षणपद्धतीत एकच प्रवेश परीक्षेचे कॅलेंडर नाही, ही सर्वांत मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात बदल घडणे आवश्यक आहे. दरम्यान, कंसोर्टियम फॉर अ‍ॅडव्हान्सिंग इंडियन टर्शरी एज्युकेशन (साईट) संघटना अस्तिवात आणली. याद्वारे उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य साईटद्वारे केले जाणार आहे

Back to top button