भामा आसखेड धरणात 82.68 टक्के पाणीसाठा | पुढारी

भामा आसखेड धरणात 82.68 टक्के पाणीसाठा

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 82.68 टक्के पाणीसाठा स्थिर आहे. धरणातील पाणीसाठा खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांना शेतीसह पाणी योजना आणि पुणे महापालिकेच्या पूर्व भागाला होत आहे. खेडच्या पश्चिम भागात करंजविहिरे भामा नदीवर भामा आसखेड धरण प्रकल्प 8.14 टीएमसी पाणीसाठा क्षमतेचा आहे.

धरणातील पाण्याचा फायदा जिल्ह्यातील खेड, शिरूर, दौंड आणि हवेली या चार तालुक्यांतील शेतीसह पिण्याचे पाणी योजनांना होत आहे. तसेच पुणे महापालिकेच्या पूर्व भागातील गावांसाठी धरणावरून महत्त्वाकांक्षी पाणी योजना साकारली आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरण 100 टक्के भरले होते. मागील वर्षी शेतकर्‍यांच्या मागणीवरून शेतीसाठी पाणी सोडले होते. त्यानंतर आजअखेर धरणात 82.68 टक्के म्हणजेच 6.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणातून पाणी सोडण्याचे आवर्तन ठरले असून, त्यानुसार धरण प्रशासन पाणी सोडणार आहेत. सध्यातरी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वरील चार तालुक्यांतील शेतीला आणि पाणी योजनांना पाणी उन्हाळ्यातदेखील मिळणार आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 668.94 मीटर असून, एकूण पाणीसाठा 193.049 दशलक्ष घनमीटर झाला आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 179.527 दशलक्ष घनमीटर आहे. 1 जून 2022 पासून आजपर्यंत 1 हजार 277 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद धरण प्रशासनाकडे झाली आहे.

Back to top button