कर्नाटक, तेलंगणा देशाला दिशादर्शक : शरद पवार | पुढारी

कर्नाटक, तेलंगणा देशाला दिशादर्शक : शरद पवार

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये केवळ आश्वासनांची खैरात करून आणि विरोधकांवर टीका करून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा उद्योग मांडलेल्या भाजप सरकारची वाटचाल लोकशाही संपवून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. याउलट कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी चांगल्या योजना राबवत सत्तेच्या माध्यमातून देशाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर बुधवारी चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. प्रा. सुभाष जोशी होते. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री डी. सुधाकर, गुजरातचे आ. जिग्नेश मेवाणी उपस्थित होते.

पवार म्हणाले, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये चांगले काम करणार्‍या अरविंद केजरीवाल यांनाही साम, दाम, दंड आणि भेद वापरून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अडचणीत आणून जनतेला विनाकारण वेठीस धरले जात आहे. तरुणांना नोकर्‍या देतो, अशा भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तरुणांची शक्ती विघातक बाबीकडे वळवली आहे. हे देशाला घातक आहे. याउलट कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने जनतेसाठी गॅरंटी योजना यशस्वी राबवून आश्वासनांची पूर्तता केली आहे. ही दोन्ही राज्ये देशाला दिशादर्शक आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक असून जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यापासून पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी सामान्य माणसांचा हा लोकशाहीचा अधिकार जपून ठेवला आहे. मोदी सरकार हा अधिकार हिरावून घेत आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही पवार यांनी केले.

आ. जिग्नेश मेवाणी म्हणाले, भूलथापांनी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सर्वांचा भ्रमनिरास केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलण्याचा कट भाजपने घातला आहे. त्यामुळे हे संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. युवानेते उत्तम पाटील म्हणाले, महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. शरद पवारांसारखा 84 वर्षांचा योद्धा संविधान वाचवण्यासाठी पायाला भिंगरी बांधून देशभर फिरत आहे. भाजपला रोखण्याची हीच खरी वेळ आहे. शरद पवार यांनी मांगूर फाटा येथे होणारा पूल भराव हटवून पिलरद्वारे उभारण्यासाठी प्रयत्न करून शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करा. दलित क्रांतीसेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, राजू खिचडे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, नानासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सभेत अस्लम शिकलगार व तेली समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी मंत्री डी. सुधाकर, अभिनंदन पाटील, पृथ्वीराज पाटील, राहुल जारकीहोळी, शुभांगी जोशी, धनश्री पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, अनिता पठाडे, शांता सावंत, उपासना गारवे, संजय सांगावकर, दत्ता नाईक, गजानन कावडकर, निरंजन पाटील, राजू पाटील, विष्णू कडाकणे, सुनील संकपाळ, गोपाळ नाईक, स्मिता दुमाले, सतीश पाटील, शिरिष कमते, इम्रान मकानदार उपस्थित होते.्र्र्र्र्र-

भाजपमुळेच महागाई

भाजप सत्तेत आल्यावर 400 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या हजार रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोलचे दर दुपटीने वाढले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. भाजपमुळेच महागाई वाढल्याची टीका शरद पवार यांनी केली.

Back to top button