पुणे : डीपी रस्त्यावर महापालिका प्रसन्न ! काम होऊनही पुन्हा काढले टेंडर | पुढारी

पुणे : डीपी रस्त्यावर महापालिका प्रसन्न ! काम होऊनही पुन्हा काढले टेंडर

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी येथील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता या डीपी रस्त्याचे काम ज्या ठिकाणी करण्यात आले होते, त्याच ठिकाणी पुन्हा नवीन निविदा (टेंडर) काढून काम सुरू करण्यात आल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नव्याने काम करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. या डीपी रस्त्याचे काम भूसंपादनासह विविध अडचणीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. महापालिकेने डीपी रस्त्यासाठी निधीही मंजूर केला होता. मात्र, अर्धवट कामामुळे पूर्ण निधी खर्च झाला नाही. आता या रस्त्याच्या कामासाठी नव्याने 37 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सुरुवातीचे काम मात्र पडून आहे. मात्र, मध्यभागी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करून दगड, राडारोड्याचे भराव टाकले आहेत. यापूर्वी केलेल्या रस्त्याच्या ठिकाणीच पुन्हा काम सुरू करण्यात आले असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.

या रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी केलेली तक्रार चुकीची आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. अगोदर करण्यात आलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पुन्हा काम केले जात नाही. सर्व काम निविदेप्रमाणे केले जात आहे.

– नरेश रायकर,  उपविभागीय अभियंता, सिंहगड रोड विभाग

Back to top button