ओतूरला भली मोठी चप्पल पाहायला गर्दी; तब्बल 22 किलो वजन व साडेपाच फूट उंच | पुढारी

ओतूरला भली मोठी चप्पल पाहायला गर्दी; तब्बल 22 किलो वजन व साडेपाच फूट उंच

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : ‘हौसेला मोल नसते’ असा प्रत्यय ओतूर (ता. जुन्नर) येथे आला. गावातील प्रकाश ऊर्फ बाळासाहेब हिरे यांनी फक्त छंद म्हणून भली मोठी कोल्हापुरी चप्पल बनवली आहे. सुमारे 5.5 फूट उंच आणि 22 किलो वजनाची कलाकुसरीने हाताने बनवलेली चप्पल पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. हिरे यांना ही चप्पल तयार करण्यासाठी दीड महिना कालावधी लागला. पत्नी, मुले, वडील यांचे त्यांना सहकार्य लाभले.

20 हजारांपेक्षा अधिक खर्च, खर्‍या चमड्याचा वापर, आकर्षक कलाकुसर करून ही कोल्हापुरी चप्पल त्यांनी बनवली आहे. चर्मकार समाजाची कला जोपासण्यासाठी आणि आपल्या आजोबांचा वारसा (खंडू हिरे आणि कंपनी) जपण्यासाठी बनवलेली कोल्हापुरी चप्पल ओतूरच्या बाजारपेठेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चप्पल बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. त्यांच्या कलाकुसरीचे ओतूर परिसरातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button