पिंपरी : उर्वरित नागरिकांना ‘बुस्टर’ कधी ? सध्या लसीचाच तुटवडा | पुढारी

पिंपरी : उर्वरित नागरिकांना 'बुस्टर' कधी ? सध्या लसीचाच तुटवडा

दीपेश सुराणा : 

पिंपरी : कोरोनाचे रुग्ण मार्च महिन्यात वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांकडून बूस्टर डोसची (प्रिकॉशन डोस) मागणी वाढली आहे. गेल्या दोन वर्षात 16 लाख 14 हजार 656 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यापैकी गेल्या वर्षभरात 2 लाख 26 हजार 633 नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला आहे. सध्या कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा असल्याने या लसीचा दुसरा डोस
घेतलेल्या नागरिकांना बूस्टर डोस कधी मिळणार, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

कोव्हॅक्सिन लस देखील सध्या महापालिकेच्या 8 केंद्रांवर मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णालयांमध्ये या लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांची नावे नोंदवून घेऊन लस मिळाल्यानंतर त्यांना बूस्टर डोस दिला जात आहे. देशभरात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. तर, जानेवारी-2022 पासून कोवीड लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवस मोफत बूस्टर डोस देण्यात आला. गेल्या वर्षभरात शहरामध्ये 2 लाख 26 हजार 633 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. त्यामध्ये 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटातील 98 हजार 833 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.

मागणी वाढली मात्र डोस मिळण्यात अडचणी

विदेशामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. तसेच, मार्च महिन्यात देशामध्ये कोरोनाची संभाव्य लाट येण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांकडून बूस्टर डोसची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या महापालिकेच्या केंद्रांवर बूस्टर डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. कोव्हिशिल्ड लस तर उपलब्धच नाही आणि कोव्हॅक्सिन लस आहे तर, त्याचाही साठा मर्यादित प्रमाणात आहे.

कोव्हिशिल्ड लसचा तुटवडा

महापालिकेच्या 8 केंद्रांवर सध्या कोव्हिशिल्ड लसचा तुटवडा जाणवत आहे. ही लस उपलब्ध नसल्याने कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ज्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांना हा डोस मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच, ज्यांनी या लसीचा दुसरा डोस घेतला मात्र बूस्टर डोस घेतलेला नाही, त्या नागरिकांना देखील आता त्यासाठी प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

कोर्बेव्हॅक्सचा पत्ता नाही

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड पाठोपाठ कोर्बेव्हॅक्स लसीचाही पत्ता नाही. कोर्बेव्हॅक्स या लसीला बूस्टर डोससाठी मान्यता मिळालेली आहे. मात्र, ही लसच सध्या उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याची माहिती केंद्रांतून मिळाली.

महापालिकेचे लसीकरण केंद्र
ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल (आकुर्डी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय (चिंचवड) नवीन थेरगाव रुग्णालय (थेरगाव) स्व. अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी)  यमुनानगर रुग्णालय (यमुनानगर) नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी) अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा (सांगवी)
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग, रुम नं. 62.

 

महापालिकेकडून 8 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीद्वारे कोवीड प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. सध्या कोव्हिशिल्ड आणि कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध नाही.
                               – डॉ. वर्षा डांगे,  महिला वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Back to top button