पुणे : वाणेवाडीत उपसरपंच निवडीत गाव पॅनेलला धक्का | पुढारी

पुणे : वाणेवाडीत उपसरपंच निवडीत गाव पॅनेलला धक्का

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : वाणेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या उपसरपंच निवडणुकीत 4 सदस्य संख्या असलेल्या गटाला उपसरपंचपदाची लॉटरी लागली. एकीकडे गाव पॅनेलचे 9 सदस्य निवडून येऊनही 2 सदस्यांनी आपले मत सरपंच गटाला देत उपसरपंचपदाची माळ धीरज संपत चव्हाण यांच्या गळ्यात टाकली. 9 पैकी दोन सदस्य फुटल्यानेच हे शक्य झाले. याची परिसरात जोरदार चर्चा झाली. 13 सदस्यांपैकी नऊ सदस्य निवडून आणल्यानंतरही गाव पॅनेलला उपसरपंचपद मिळवता आले नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून गीतांजली दिग्विजय जगताप या सरपंच म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.

त्यांच्या गटाचे फक्त 4 सदस्य आणि सरपंच असे 5 संख्याबळ होते. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी गुप्त पध्दतीने मतदान पार पडले. गाव पॅनेलकडून अजित रामचंद्र भोसले आणि सरपंच गीतांजली दिग्विजय जगताप यांच्या गटाकडून धीरज संपत चव्हाण यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीत दोघांनाही समान 7 मते पडली. यानंतर सरपंच गीतांजली जगताप यांनी आपले निर्णायक मत धीरज चव्हाण यांना देत 15 दिवसांत दोनवेळा गुलाल उधळण्याची संधी आपल्या कार्यकर्त्यांना दिली. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडत आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. गावडे, विस्तार अधिकारी डी. डी. खंडागळे यांनी काम पाहिले, तर विस्तार अधिकारी पी. के. गाढवे यांनी त्यांना साहाय्य केले.

 

Back to top button