चाकण : गुरांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल | पुढारी

चाकण : गुरांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल

चाकण; पुढारी वृत्तसेवा : कृषी बाजार समिती, खेड यांच्या महात्मा फुले मार्केट यार्ड, चाकण येथे दर शनिवारी भरणारा सर्व प्रकारच्या गुरांचा आठवडे बाजार शनिवार (दि. 31) पासून पुन्हा सुरू झाला आहे. मागील चार महिने बंद असलेला बाजार सुरू झाल्याने पशुपालक शेतकर्‍यांनी बाजारात मोठी गर्दी केली होती.

पहिल्याच दिवशी चाकण बाजारात तब्बल 215 बैल, 60 गायी, 207 म्हैस व 9 हजार 140 शेळ्या, मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. गुरांच्या बाजारात 2 कोटी 40 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. लम्पी स्कीन आजार बाधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर जनावरांचे आठवडे बाजार बंद होते. मात्र, आता हा रोग आटोक्यात आल्यानंतर चाकण येथील जनावरांचा बाजार पुन्हा शनिवार पासून नियमित सुरू झाला आहे.

गुरे निरोगी असल्याची खात्री करण्यात आली. जनावरांना लंपीरोग प्रतिबंधक लसीकरण केल्याची खात्री करण्यात आली. कानात टॅग, नंबर बिल्ला, विहित नमुन्यातील आरोग्य दाखला व वाहतूक प्रमाणपत्र यांची खात्री केल्याचेही बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले, असे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. गुरांचे लसीकरण केलेले आहे. मात्र पशुवैद्यकीय विभागाने या बाबतची कागदपत्रे , दाखले दिलेले नाहीत. शासनाच्या जाचक अटींमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे पशुपालक शेतकर्‍यांनी सांगितले.

बाजाराची स्थिती
8 215 बैल, 60 गायी, 207 म्हशी, 9 हजार 140 शेळ्या-मेंढ्यांची उपस्थिती
8 तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांची उलाढाल

Back to top button