पुणे : प्रत्येक डेपोत महिलांसाठी स्वच्छतागृह; महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची माहिती | पुढारी

पुणे : प्रत्येक डेपोत महिलांसाठी स्वच्छतागृह; महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएलच्या प्रत्येक डेपोत महिला कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृह आणि विश्रामकक्ष या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पीएमपीएलमधील महिला कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आयोगाकडे दाखल तक्रारी, निवेदनाच्या संदर्भात चाकणकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.

यासंदर्भात चाकणकर म्हणाल्या, ’पीएमपीएमएलमध्ये महिला कर्मचार्‍यांची संख्या वाढत आहे. या महिलांना स्वच्छतागृहाची व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत केवळ प्रमुख स्थानकच नाही, तर प्रत्येक डेपोत महिला कर्मचार्‍यांसाठी स्वच्छतागृह, विश्रामकक्ष, तक्रार निवारण समिती, तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीची स्वतंत्र व्यवस्था, तक्रारींचा निपटारा, डेपोत सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशा सूचना केल्या. त्यावर प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, महिनाभरात त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

पुण्यातील 85 महिला परदेशात अडकल्या
ओमान-दुबईमध्ये पुणे जिल्ह्यातील 85 महिला अडकल्या आहेत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून तेथे नेण्यात आले आहे. संबंधित महिलांचे मोबाईल क्रमांकही बंद आहेत. यासंदर्भात आयोगाने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून, त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

पीडितेच्या नावाचा उल्लेख टाळा
विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदारांकडून पीडित महिला, मृत महिलेच्या नावाचा उल्लेख केला जात आहे, तसेच समाजमाध्यमांवरही नावांचा उल्लेख केला जातो. हे कृत्य कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे आमदारांना यासंदर्भात माहिती द्यावी, असे पत्र राज्याचे प्रधान सचिवांना पाठविण्यात आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

Back to top button