पुणे : पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; रात्री उशिरापर्यंत ठाण्यात अधिकार्‍यांचा तळ | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त अ‍ॅक्शन मोडवर; रात्री उशिरापर्यंत ठाण्यात अधिकार्‍यांचा तळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर रितेश कुमार यांनी पहिली आठवडा बैठक (डब्लूआरएम) आज बोलावली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांतील प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त बुधवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात तळ ठोकून होते. बैठकीच्या ठरविण्यात आलेल्या रूपरेषेनुसार प्रत्येक मुद्द्याला अनुसरून माहिती एकत्र करीत होते. त्यानंतर पोलिस उपायुक्तांनीदेखील ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांकडून बैठकपूर्व तयारीचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांच्या कार्यकाळातील आठवडा बैठकीची आठवण झाल्याचे काही अधिकार्‍यांनी सांगितले. व्यंकटेशम् यांच्या आढावा बैठकीची अशीच दहशत होती. ते कोणत्या अधिकार्‍याला ठाण्याच्या कामकाजातील कोणती माहिती कधी विचारतील, याचा नेम नव्हता.

त्यामुळे प्रत्येक अधिकारी बैठकीच्या दोन-तीन दिवस अगोदरच दप्तर तयार करून ठेवण्यास सुरुवात करीत होते. आजच्या आढावा बैठकीचीदेखील तशाच प्रकारे माहिती मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वेगात कामाला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कोणत्याही अधिकार्‍याला वैयक्तिक न भेटता तसेच हारतुरे न स्वीकारता पुणे पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते पहिलीच आढावा बैठक घेणार आहेत.

Back to top button