पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या म्होरक्यासह दोघांना अटक | पुढारी

पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या म्होरक्यासह दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या प्रयत्नानंतर तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई झाल्यापासून फरार असलेल्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना गुन्हेशाखेच्या खंडणी विरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. सोन्या उर्फ राज रविंद्र भवार (22) आणि गौरव सुनिल कदम (22, दोघेही रा. धानोरी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, मोक्का तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 डिसेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस कर्मचारी रविद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे व राजेंद्र लांडगे यांना गुन्ह्यात फरार असलेला म्होरक्या सोन्या भवार हा चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान त्याचा साथीदार अकलूज येथे असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्याला अकलूज येथील हॉटेल सुभाष बिअरबार येथून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला पुढील तपासासाठी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली

Back to top button